राजगुरुनगर: गावातून वाजत गाजत मिरवणूक काढून वधु-वर कार्यालयात आले, वाजंत्री लावून साखरपुड्याची ताटे व्यासपीठावर आणली, दोन्हीकडच्या भरगच्च उपस्थितीत सुपारी फुटली, औक्षण झाले आणि मांडवातील पै-पाहुण्यांनी जेवणावर यथेच्छ ताव मारला. मात्र साखरपुडा संपल्यावर हळदी लागायच्या आधीच कार्यालयात पोलीस आले आणि लग्न थांबले.वधूचे वय केवळ दोन महिन्यांनी कमी असल्याने हा कायद्याने बालविवाह ठरला गेला असता. त्यामुळे पोलिसांनी वधू-वर पक्षाच्या जेष्ठांना समजावून सांगूनहा विवाह रोखला आणि त्याचवेळी दोन महिन्यांनी हा विवाह पुन्हा होण्याची घोषणा झाली. त्यामुळे लग्नासाठी आहेर-गिफ्ट घेऊन आलेले पाहुणे पुन्हा गिफ्ट घेऊन परतले. ही घटना आहे राजगुरुनगर परिसरातील. बुधवारी (दि१२) नियोजित असलेल्या या विवाह समारंभात घडलेल्या या घटनेची तालुकाभर चर्चा रंगली. दोन्ही बाजूने संमतीने ठरलेला व उत्साही वातावरणात सुरु असलेला हा समारंभ एका कार्यालयात होणार होता. त्यासाठी पत्रिका छपाई करून नातेवाईक, स्नेहीजनाना वाटप करण्यात आले होते. साखरपुड्याला गर्दी झाली होती. लग्न सामारंभ सुध्दा तोलामोलाचा होणार होता. मात्र तसे घडले नाही.एका अज्ञात व्यक्तीने खेड पोलिसाना माहिती कळवली.त्यानंतर पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस राजेश नलावडे, संजय नाडेकर,निखील गिरीगोसावी, विशाल कोठावळे यांनी सबंधित कार्यालयात जाऊन खातरजमा करून हा बाल विवाह रोखला.याबाबत दोन्ही बाजूच्या जबाबदार व्यक्तींकडून माहिती घेतली असता. वैयक्तिक वादातून अज्ञात व्यक्तीने तक्रार केल्याने केवळ साखरपुडा उरकला. मुलीला १८ वर्षे पूर्ण व्हायला दोन महिने बाकी आहेत. त्यानंतर लंग समारंभ संपन्न केला जाईल असे सांगण्यात आले.मुलीच्या वडीलांचे निधनांने नातेवाईकांनी केली घाईमुलीच्या वडीलांचे काही महिन्यापूर्वी निधन झाले आहे. आई आजारी असून कुटुंबात इतर कोणीही जबाबदार व्यक्ती नसल्याने नातेवाईकानी हा विवाह करायचे ठरवले होते. मात्र तसे घडले नाही. समाजात मुलींबाबत घडणा-या विचित्र घटना विचारात घेऊन नातेवाईकानी हे पाउल उचलले होते. मात्र भावना,जबाबदारी यापेक्षा कायद्यापुढे कर्तव्य हतबल झाल्याची खंत मुलीच्या एका नातेवाईकाने व्यक्त केली.
.... असा रोखला बालविवाह ; चित्रपटाप्रमाणे घडली घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 8:50 PM