निमगिरी येथे लग्नघरी आदल्यादिवशी वाजत गाजत साखरपुडा, टिळा, हळदी समारंभ झाले होते. दुसऱ्या दिवशी वधुवरांच्या डोक्यावर अक्षता पडणे बाकी असतानाच पोलीस व महिला बालविकास विभागाचे अधिकारी लग्नघरी आल्याने पाहुणे, आप्तेष्टांची धावपळ उडाली. वधूचे वय १७ वर्षांपेक्षा कमी असल्याने हा बालविवाह यावेळी प्रशासनाकडून रोखण्यात आला. महिला बालविकास विभागाचे अधिकारी, जुन्नरचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, व सहकारी अक्षय साळुंके यांनी ही कारवाई केली. यावेळी वधुस १८ वर्षे पूर्ण झालेली नाही. सात महिने कालावधी बाकी असल्याने हा विवाह करता येणार नाही. बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे, असे दोन्हीकडील नातलगांना समजावण्यात आले. तसेच पालकांचे हमीपत्र घेऊन पाच हजाराचा दंड करण्यात आला. दुसरी बालविवाह बेल्हे येथे आयोजित करण्यात आला होता, याची माहिती जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयास दूरध्वनीवरून मिळाली होती. या ठिकाणीदेखील वधु-वरांवर अक्षता पडण्यापूर्वीच हा बालविवाह रोखला गेला. येथील वधूचे वय १८ वर्षांपेक्षा कमी होते. तर स्थानिक मंगल कार्यालय व्यवस्थापनाने वधू व वर यांचे जन्मदिनाकांचे पुरावे घेतले नव्हते. तसेच मंगल कार्यालयात बालविवाह आयोजित केल्याने पाच हजारांचा दंड करण्यात आला. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आश्विनी कांबळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी परम आनंद यांच्या मागर्दशनाखाली जुन्नरचे अभय केंद्र संरक्षण अधिकारी अक्षय साळुंखे यांनी ही कारवाई केली.
बालविवाह होत असतील तर 1098 या चाईल्ड लाईनवर संपर्क करून बालविवाह रोखण्यास मदत करावी, असे आवाहन महिला बालविकास अधिकारी पुणे व जुन्नर कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.