- पुणे जिल्ह्यात तीन वर्षांत ७ लोकांचा वीज पडून मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : दर वर्षी माॅन्सूनपूर्व पावसात जिल्ह्यात वीज पडण्याच्या अनेक घटना घडतात. यात पुणे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत ७ लोकांचा वीज पडून मृत्यू झाला. तर काही ठिकाणी मोठी वित्तहानीदेखील झाली आहे. या पार्श्वभूमीवरच पुणे जिल्ह्यात तब्बल ८०० गावांमध्ये वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या वीज अटकाव यंत्रणेच्या पायलट प्रोजेक्टमध्ये चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे.
वीज पडणे ही नैसर्गिक घटना असली तरी दर वर्षी यामुळे मुनष्य, पशु आणि वित्त हानी होत असते. जगभरात तसेच भारतातसुद्धा वीज पडल्यामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण जास्त आहे. एका सर्वेक्षणानुसार दरवर्षी सुमारे २५०० व्यक्तींचा मृत्यू वीज पडल्यामुळे होत असतो. त्यामुळे वीज पडणे या घटनेला गांभीर्याने घेतले पाहिजे जेणेकरून मनुष्य, पशु आणि वित्त हानीचे प्रमाण कमी करता येईल. ग्रामीण भागात वीज पडून होणारे मृत्यूचे प्रमाण हे शहरी भागापेक्षा जास्त आहे. माॅन्सून सक्रिय होण्याच्या एक महिना अगोदर अवकाळी आणि पूर्वमौसमी पावसाच्या काळात विजा कोसळण्याचे प्रकार सर्वाधिक घडतात. पाऊस पडण्याच्या आधी आकाशात ढग जमतात आणि काही मिनिटात गडगडाटी वादळासह विजा चमकतात आणि मोठ्या आवाजासह कुठेतरी पडतात. याच कालावधीत शिवारात मशागतीची तयारी सुरू असते, त्यावेळी शेतात कामे करीत असलेल्या शेतकऱ्यांचा, शेत मजुरांचा आणि जनावरांचा वीज पडून मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटना नियमित घडत असतात. वीजपडीमुळे होणारी मनुष्य हानी टाळण्यासाठी राज्य शासनाने सर्वाधिक धोका असलेल्या गावांमध्ये वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. यात एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल ८०० गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
------
वीज पडल्याने झालेले मृत्यू
वर्ष मनुष्यबळी जनावरांचा मृत्यू
2019 2 -
2020 1 -
2021 4 -
-------
जिल्ह्यात २८ लाखांची नुकसान भरपाई
पुणे जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत वीज पडून ७ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. वीज पडून मृत्यूमुखी पडणा-या व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनाकडून ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई दिली जाते. जिल्ह्यात आतापर्यंत सर्व कुटुंबीयांना ही नुकसान भरपाई देण्यात आली असून, आतापर्यंत २८ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.
--------
वीज कडाडत असताना ही घ्या काळजी (आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मार्गदर्शक सूचना)
- विद्युत उपकरणे चालू करून वापरू नका. जसे की हेअर ड्रायर, विद्युत टुथब्रश किंवा विद्युत रेझर, जर वीज तुमच्या घरावर किंवा घराजवळ कोसळली, तर तुम्हाला विजेचा धक्का बसू शकतो.
- वादळात टेलिफोनचा वापर टाळा, वीज टेलिफोनच्या घरावरील तारांमधून वाहू शकते.
- बाहेर असताना धातूच्या वस्तूंचा वापर टाळा.
- अर्धवट अवस्थेत बांधकाम झालेल्या इमारतीचा आसरा घेऊ नका.
- जर तुम्हाला विद्युत भारीत वाटत असेल, तुमचे केस उभे असतील किंवा त्वचेला मुंग्या येत असतील, तर तुमच्यावर वीज कोसळण्याची शक्यता आहे. त्वरित जमिनीवर ओणवे व्हा किंवा गुडघ्यात मान घालून बसा.
-------
जिल्ह्यात ८०० गावांत वीज अटकाव यंत्रणा बसविण्याचे काम सुरू
राज्य शासनाने यंदा प्रायोगिक तत्त्वावर चंद्रपूर आणि पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागात वीज पडण्याचा सर्वाधिक धोका असरेल्या गावात वीज अटकाव यंत्रणा बसविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात ८०० गावांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येणार असून, याबाबत काम सुरू असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे यांनी दिली.