पुणे : कोयत्या गँगपासून अगदी छोट्यामोठ्या कारणावरून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० हजार ९७३ गुन्हेगारांवर शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. १२ गुन्हेगारी टोळ्यांमधील ७५ जणांवर मोक्का कारवाई केली. तसेच ४३ गुन्हेगारांना तडीपार केले. झोपडपट्टीदादा विषयक एमपीडीए कायद्यान्वये ४ गुन्हेगारांना एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी कार्यभार घेतल्यानंतर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी ऑल आऊट व कॉम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगार चेकिंग, गुन्हेगार आदान-प्रदान, दत्तक गुन्हेगार अशा योजना राबवल्या. सात वर्षांवरील रेकॉर्डवरील शरीराविरुद्धचे एकूण २२ हजार ६०७, मालमत्तेविरुद्धचे ६ हजार ६११ गुन्हेगारांची यादी तयार केली. त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून प्रतिबंधात्मक कारवाई केली. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात गुन्हेगारीमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे.