पुणे : तापत्या उन्हामुळे भाजीपाल्याचे भाव वाढले आहेत. विशेषत: पालेभाज्या जास्त महाग झाल्या आहेत. यामध्ये कोथिंबीर, शेपू, मेथी, मुळा आणि कांदापातीचे दर किरकोळ बाजारात वाढले आहेत. या सर्व भाज्यांच्या प्रति जुडीला किरकोळ बाजारात ३० रुपयांहून अधिक दर मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य गृहिणींना मात्र महागाईचा सामना करताना दमछाक होत आहे.
फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो)
प्रकार भाव
बटाटे-३० ते ४० रुपये
कांदे-२० ते ३० रुपये
टोमॅटो-८० ते १०० रुपये
गवार-६० ते ८० रुपये
भेंडी- ४० ते ६० रुपये
कोबी-२० ते ३० रुपये
काकडी-३० ते ४० रुपये
फ्लॉवर-३० ते ४० रुपये
शेवगा-६० ते ८० रुपये
वांगे-४० ते ६० रुपये
पालेभाज्या कडाडल्या
मेथी, कोथिंबीर, शेपू, मुळा, चुका आणि कांदापातीचे किरकोळ बाजारात दर वाढले आहेत. मेथी, कोथिंबीर, शेपू, मुळा तसेच कांदापातीचे दर प्रति जुडीला २० ते ३० रुपयांहून अधिक झाले आहेत.
बाजारात सध्या भाजीपाल्याची आवक सध्या मंदावली आहे. त्यातच उन्हामुळे भाजीपाल्याच्या प्रतवारीवर परिणाम होत आहे. तसेच इंधन दरवाढीमुळे मार्केट यार्डातून भाजीपाला आणण्यासाठी पूर्वीपेक्षा खर्च वाढला आहे. आणलेल्या मालात खराब माल जास्त निघत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढवावे लागतात.
- रूपेश वाळके, भाजी विक्रेता
गेल्या वर्षभरापासून इंधन दरवाढीच्या नावाखाली सातत्याने किराणा मालासह भाजीपाल्याचे दर वाढवले जात आहेत. काही दिवसांपूर्वी दर आवाक्यात आले होते. मात्र, आता पुन्हा कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापातीचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे काटकसर करावी लागत आहे.
- सुनीता हारगुडे, गृहिणी