लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुण्यासह राज्यात थंडीचा कडाका वाढला असला तरी मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहे. परंतु मागणी वाढल्याने भेंडी,काकडी, टोमॅटो आणि शेवग्याच्या दरात १०-२० टक्यांनी वाढ झाली. तर आवक वाढल्याने कांदा, बटाट्यासह मटार, आले आणि लसणाचे दर उतरले आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले आहेत. अन्य सर्व फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.
गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवार (दि.२७) रोजी सुमारे ८० ते ९० ट्रक शेतीमालाची आवक झाली.यात स्थानिक मालासह परराज्यातील मालाचा समावेश आहे. परराज्यातुन आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून १२ ट्रक गाजर, कर्नाटक, गुजरात येथुन ३ ते ४ टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात येथुन १० ते १२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथून शेवगा २ ते ३ टेम्पो, मध्यप्रदेश येथून मटारची ३० ते ३५ ट्रक, तर मध्यप्रदेश आणि गुजरात येथून १० ते १२ ट्रक लसणाची आवक झाली. स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १५०० ते १६०० पोती, कोबी सुमारे ४ ते ५ टेम्पो, फ्लॉवर १० ते १२ टेम्प्पो, भेंडी ७ ते ८ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, सिमला मिरची ८ ते १० टेम्पो, टोमॅटो सात ते साडेसात हजार पेटी, भुईमुग शेंगा सुमारे ४० ते ५० गोणी, तांबडा भोपळा ८ ते १० टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, कांद्यामध्ये जुना ३० ट्रक, तर नवीन ७० ते ७५ ट्रक, आग्रा, इंदौर, गुजराथ आणि स्थानिक मिळून बटाट्याची ४५ आवक झाली.
-------
थंडीमुळे पालेभाज्यांची आवक घटली; दर कडाडले
गेल्या आठवड्यात पडलेल्या कडाक्याच्या थंडीचा पालेभाज्यांवर परिणाम झाला आहे. आवक काही प्रमाणात घटली आहे. परंतु मागणी वाढल्यामुळे पालक, कोथिंबिर, चुका आणि मुळेच्या दरात वाढ झाली आहे. पालकच्या दरात घाऊक बाजारात जुडीमागे ७ रुपये, कोथिंबिर आणि चुकाचे दर प्रत्येकी ३ रुपये, मुळा २ रुपये वाढ झाली आहे. तर, आवकच्या तुलनेत मागणी घटल्यामुळे कांदापात आणि मेथीच्या दरात जुडीमागे अनुक्रमे ७ आणि ४ रुपये घट झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व पालेभाज्यांचे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
- अमोल घुले, उपाध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशन
--
भाजीपाला घाऊक दर किरकोळ दर
कांदा २०-२५ ३०-५०
बटाटा १६-२३ ३०-४०
टोमॅटो १०-१६ १५-२५
भेंडी ३०-४० ४०-५०
गवार ३९-४० ४०-५०
मिरची ४०-५० ४५-५५
कोथींबीर ०२-०८ १०-१५
मेथी ०७-०८ १०-१५
मटार १८-२२ २५-३५