लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मार्केट यार्डातील फळ विभागात रविवारी (दि. ४) स्ट्रॉबेरी, संत्रा, द्राक्षे, लिंबू, चिक्कू, कलिंगड आणि पपईच्या दरात वाढ झाली. तर पेरुच्या दरात मात्र घट झाली असून, खरबूज, डाळींब, मोसंबी आणि अननसाचे दर मात्र स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
उन्हामुळे कलिंगड आणि खरबुजाला मागणी वाढली आहे. कलिंगडाच्या दरात किलोमागे एक रुपयाने वाढ झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पपईला मागणी वाढल्याने दरात किलोमागे एक रुपयाने वाढ झाली. तर संत्र्यांची आवक घटल्याने दरात दुपटीने वाढ झाली. स्ट्रॉबेरीचीही आवक घटल्याने ४० ते ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे़ चिक्कूच्या दरात गोणीमागे ३०० रुपयांनी वाढ झाली. द्राक्षांच्या दरातही १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली.
रविवारी मार्केटयार्डात फळबाजारात केरळ येथून अननस ४ ट्रक, मोसंबी १५ ते २० टन, संत्री २ ते ३ टन, डाळिंब ३० ते ४० टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे एक ते दीड हजार गोणी, पेरू १०० के्रट , चिक्कू दोन ते अडीच हजार गोणी खरबुजाची ५० ते ६० टेम्पो, स्ट्रॉबेरी १ ते २ टन, इतकी आवक झाली.
-----
लाॅकडाऊनमुळे फुलाचा बाजार उठला
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर देऊळ बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. याखेरीज, लग्नसमारंभावरील मर्यादा, रद्द केलेल्या यात्रा, जत्रा तसेच जमावबंदी व संचारबंदी लागू केल्याने मार्केट यार्डातील फुलबाजारात फुलांना मागणी घटली आहे. त्यातुलनेत आवक जास्त होत असल्याने फुलांच्या दरात निम्म्याने घसरण झाली आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून मोगऱ्याची फुले दुपारच्या सुमारास बाजारात दाखल होतात. मात्र, ती विणून बाजारात येईपर्यंत संचारबंदी लागू होते. त्यामुळे सुवासिक मोगऱ्यालाही अपेक्षित मागणी नाही. सध्यस्थितीत घरपोच हार, फुले देणाऱ्यांकडून फुलांची खरेदी होत असल्याचे सांगण्यात आले.