पुणे : 'बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या'( बीएमसीसी) माजी विद्यार्थी संघटनेतर्फे देण्यात येणारा प्राईड ऑफ बीएमसीसी पुरस्कार जाहीर झाला आहे. यंदा हा पुरस्कार कायनॅटिक ग्रीन एनर्जी अॅन्ड पाॅवर साेल्युशन्स च्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिराेदिया माेटवानी आणि हाेप फाऊंडेशनच्या अरुणा मुकेश कटारा यांना जाहीर झाला आहे. तर गुरुवर्य पुरस्कार प्रा. एन. डी. आपटे आणि डाॅ. एस. जी बापट यांना देण्यात येणार आहे. हा पुरस्कार प्रदान साेहळा रविवारी 8 मार्च राेजी हाेणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रकांत रावळ आणि बीएमसीसी माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अरुण निम्हण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्राचार्य चंद्रकांत रावळ म्हणाले की, यंदा रविवार दिनांक ८ मार्च २०२० रोजी, संध्याकाळी ५.००(पाच) वाजता, टाटा हॉल, बीएमसीसी महाविद्यालय येथे होणाऱ्या बीएमसीसी माजी विद्यार्थी मेळाव्यात बीव्हीजी अर्थात भारत विकास ग्रुपचे संस्थापक- संचालक हणमंतराव गायकवाड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
यावेळी बोलताना अरूण निम्हण म्हणाले की, याप्रसंगी युगा बिरनाळे आणि सिद्धार्थ कांबळे यांना 'कांतामगर क्रीडा पुरस्कार', भरत फाटक यांना 'स्व. वरूणराज भिडे पत्रकारिता पुरस्कार', सतीश जकातदार यांना 'स्व. बाळासाहेब सरपोतदार पुरस्कार', नारायणदास राठी यांना 'व्यवसाय भूषण पुरस्कार', तनिष्का देशपांडे यांना 'फळणीकर पुरस्कार' आणि सक्षम कुलकर्णी यांना 'सुहास कुलकर्णी पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यावेळी बीएमसीसी महाविद्यालयाचे दानशूर माजी विद्यार्थी पुरुषोत्तम लोहिया, दिलीप ओक, डॉ. विक्रम मेहता आणि कांतिलाल बलदोटा यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य चंद्रकांत रावळ आणि अरूण निम्हण यांनी यावेळी केले.