पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा चार वॉर्डांचा मिळून बनलेल्या प्रभागनिहाय पद्धतीनुसार मतदान होणार आहे. एका मतदाराला एका गटासाठी एक याप्रमाणे चार मते द्यायची आहेत. चार गटांमध्ये मतदान करताना कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. एकाच पक्षाला चार, वेगवेगळ्या पक्षातील चार जणांना मतदान करता येऊ शकते. मात्र, चार मते द्यावीच लागणार असून, एखाद्या गटातील कोणत्याही उमेदवाराला मतदान करायचे नसल्यास त्या गटासाठी ‘नोटा’चा (वरीलपैकी कोणीही नाही) अधिकार वापरणे बंधनकारक आहे. मतदान यंत्रावरील चारही गटात चार मते दिल्यावरच मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. प्रभागानुसार मतदानाप्रमाणे अनेक प्रकारच्या अफवाही पसरविल्या जात आहेत. एका पक्षाला चार मते दिली, तर आपले मत बाद होईल किंवा चारही गटात एकाच पक्षाला मतदान केले; तर वैध ठरेल, अशा अफवा आहेत. मात्र, यामध्ये कोणतेही तथ्य नाही. एका उमेदवाराने आपल्या मताचे चार नगरसेवक महापालिकेत पाठवायचे आहेत. त्याच्या पसंतीप्रमाणे एकाच पक्षाचे चौघे, तिघे, दोघे किंवा एक असेल किंवा अपक्षही असू शकतील. एखाद्या मतदाराला केवळ एकाच किंवा दोन गटातच मतदान करायचे असल्यास उर्वरित गटांसाठी त्याला नोटाचा अधिकार वापरता येणार आहे. महापालिकेच्या ४१ प्रभागांमधील नगरसेवक पदाच्या १६२ जागांसाठी २६ लाख ३४ हजार पुणेकरांना मंगळवारी (दि. २१) मतदानाचा हक्क बजावण्यासाठी संधी मिळाली आहे. वार्षिक ५ हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असलेल्या महापालिकेचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा, हा महत्त्वाचा निर्णय पुणेकरांना या मतदानातून घ्यायचा आहे. त्यामुळे अत्यंत जबाबदारीने मतदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. मतदान यंत्रावर प्रत्येक गटासाठी स्वतंत्र रंग ठेवण्यात आला आहे.अ गटातील उमेदवारांची नावे त्यावर अकारविल्हे असतील. नाव व त्यासमोर त्या उमेदवाराचे चिन्ह व त्यासमोर मतदान करताना दाबायचे बटण याचप्रमाणे ड गटापर्यंतची रचना आहे. प्रत्येक गटातील उमेदवारांची नावे संपली, की नोटा (वरीलपैकी एकही नाही) बटण असेल. ४अ गटात ५ उमेदवार असतील तर त्यांची नावे संपल्यावर नोटा चा पर्याय व त्यानंतर एक ओळ सोडून ब गट सुरू होईल. त्यात त्या गटातील उमेदवारांची नावे व ती संपल्यावर नोटा चा पर्याय व त्यानंतर पुन्हा एक ओळ सोडून क गट त्यानंतर त्याचपद्धतीने ड गट अशी मतदान यंत्राची रचना आहे. एका यंत्राची क्षमता १६ नावांची आहे. ती संपल्यानंतर दुसऱ्या यंत्राचा वापर त्याच पद्धतीने केला जाईल. बहुसंख्य प्रभागांमध्ये १६ पेक्षा जास्त उमेदवार असल्यामुळे दोन यंत्र आहेत. काही ठिकाणी मात्र ३२ पेक्षाही जास्त उमेदवार असल्याने तिथे ३ यंत्र वापरण्यात येणार आहेत.‘लोकमत’चे आवाहनमतदान हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. मतदान हा देशाच्या लोकशाही व्यवस्थेतील अमूल्य घटक आहे. यासाठी निर्भयतेने, कसल्याही आमिषाला बळी न पडता, कोणताही भेदाभेद मनात न ठेवता मतदान करावे. आचारसंहितेचे सर्व नियम व निकष तंतोतंत पाळून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा. महापालिकेची निवडणूक प्रभाग पद्धतीने होत आहे. प्रत्येकाला चार मते द्यायचीच आहेत. एखाद्या गटात कोणताही उमेदवार पसंत नसेल तर ‘नोटा’ला (वरीलपैकी कोणीही नाही) मत द्यायचे आहे. चार मते दिल्याशिवाय मतदानप्रक्रिया पूर्ण होणार नाही. आपले अमूल्य मत बाद होणार नाही किंवा अवैध ठरणार नाही, याची प्रत्येक मतदाराने काळजी घ्यावी.असे शोधावे मतदान केंद्र मतदार यादीतील नाव व केंद्र याची चिठ्ठी निवडणूक शाखेने मतदारांना घरपोच केली आहे. अशी चिठ्ठी नसेल तर राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना त्यांचे नाव व यादीतील अनुक्रमांक असलेली चिठ्ठी दिली आहे. निवडणूक शाखेने ९०२९९०१९०१ असा क्रमांक दिला असून, त्यावर मिसकॉल केल्यावर त्यांच्याकडून फोन येईल व त्यावर माहिती दिली जाईल.४त्याशिवाय ट्रू वोटर अॅप विकसित करण्यात आले आहे. मतदाराला आपल्या मोबाईलवर ते डाऊनलोड करून घेता येईल. त्यातूनही मतदारांना आपले नाव व केंद्र शोधता येईल.मतदान करण्यासाठी जाताना मतदार यादीतील आपला अनुक्रमांक व केंद्र याची चिठ्ठी जवळ ठेवावी. पासपोर्ट, लायसन, पॅनकॉर्डपासून ते आधार कार्डपर्यंत एकूण १७ प्रकारच्या कागदपत्रांपैकी कोणतीही एक गोष्ट स्वत:जवळ ठेवावी. मतदान केंद्राधिकाऱ्याला ओळख पटवून देण्यासाठी हे आवश्यक आहे. केंद्रापर्यंत जाताना शक्यतो राजकीय व्यवस्था (वाहन वगैरे) वापरू नये कसल्याही आमिषाला भुलून मतदान करू नयेमतदान केंद्रात जाताना रांग असेल तर रांगेत थांबावे केंद्राधिकाऱ्याने ओळख पटवून देण्याची मागणी केल्यास वरीलपैकी एक कागदपत्र सादर करावे.असे असेल मतदान कक्षातील मतदान यंत्र ४यंत्रावर अ गट (पांढरा रंग) व त्यातील उमेदवाराचे नाव, चिन्ह असेल. गुलाबी रंगाच्या ब गटावर त्यातील उमेदवारांची नावे, चिन्ह असेल पिवळ्या रंगाच्या क गटावर त्यातील उमेदवारांची नावे, चिन्हे असतील. निळ्या रंगाच्या ड गटावर त्यातील उमेदवारांची नावे व चिन्ह असेल प्रत्येक गटातील उमेदवारांची नावे संपल्यानंतर नोटा असे नाव असेल.प्रत्यक्ष मतदान करताना मतदान यंत्रावरील नावे, चिन्ह याचे नीट वाचन करावे, शंका असल्यास कक्षातून बाहेर येऊन केंद्राधिकाऱ्यांकडे विचारणा करावी उमेदवाराच्या नाव व चिन्हासमोरील बटण दाबायचे आहे. एकदा बटण दाबले, की त्यात सुधारणा करता येणार नाही. प्रत्येक गटात एक मतदान करायचे आहे. मतदान करताना घाई करू नये, विचारपूर्वक करावे एखाद्या गटात कोणीही उमेदवार पसंत नसेल तर ‘नोटा’ चा पर्याय वापरावा चार वेळा बटण दाबल्यानंतरच मतदान प्रक्रिया पूर्ण होणार आहे. चारपेक्षा कमी वेळा बटण दाबल्यास केंद्राधिकारी तसे सांगणार आहे. त्यांच्या सांगण्यावरून ‘नोटा’ चा पर्याय वापरून प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. केंद्राधिकाऱ्याने ‘मतदान झाले’ असे सांगितल्यावरच केंद्रातून बाहेर पडावे
लोकशाहीची शान, करा निर्भयपणे मतदान
By admin | Published: February 21, 2017 3:40 AM