पुणे : विधायक पत्रकारितेचा वसा जपताना समाजातील मांगल्याला, सेवाभावाला वृद्धिंगत करण्यासाठी विविध क्षेत्रांत उत्तुंग कर्तृत्व गाजविणाऱ्या महिलांचा ‘लोकमत वुमेन समीट’मध्ये गौरव होणार आहे. यंदाच्या वर्षीचा मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव पुरस्कार जातीभेदाच्या भिंती तोडण्यासाठी आयुष्यभर काम करणाऱ्या नागपूरच्या कुमुद पावडे यांना, तर सौ. ज्योत्स्नादेवी दर्डा कार्यगौरव पुरस्कार महिलांच्या आर्थिक हक्कांसाठी लढणाऱ्या जळगावच्या इंदिरा पाटील यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा लोकमत मीडिया प्रा. लि. चे चेअरमन विजय दर्डा यांनी केली. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशपातळीवर होत असलेल्या कार्याला व्यासपीठ मिळवून देताना आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजापुढे दीपस्तंभ असणाऱ्यांचा गौरव ‘लोकमत’च्या वतीने करण्यात येणार आहे. दर्डा म्हणाले, ‘‘लोकमतचे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांनी मूल्ये आणि तत्त्वांचा जागर करीत समाजहितेषु परिवर्तनाच्या भूमिकेचा पुरस्कार केला आहे. याच भूमिकेतून हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.’’कुमुद पावडे यांनी स्वत: आंतरधर्मीय लग्न केले व पुढे जातीयतेच्या भिंती मोडून काढण्यासाठी ३५० आंतरधर्मीय/ आंतरजातीय लग्ने घडवून आणली. नॅशनल फेडरेशन आॅफ दलित वुमेनच्या संस्थापक सदस्य व उत्तर भारताच्या संयोजक म्हणून दलित महिलांच्या प्रश्नांवर कार्य सुरू आहे. जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वतीने रात्रशाळांमध्ये आजही कार्य करीत आहेत. इंदिरा पाटील यांनी महिलांच्या स्वावलंबनासाठी अथक प्रयत्न करून पुरुषांच्या नावे असलेली शेती अथवा घरे, यासारख्या उताऱ्यावर पत्नीचे नाव लावण्याचा उपक्रम राबविला. काही वर्षांनंतर हा उपक्रम देशासाठी ‘मॉडेल’ बनला.
कर्तृत्वशालिनींचा होणार आज गौरव
By admin | Published: March 20, 2017 4:49 AM