पुणे (निमोणे ) : 'कोरोना' विषाणूमुळे होणाऱ्या आजाराविरुद्ध, महाराष्ट्र शासन करीत असलेल्या उपाययोजनांसाठी पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी आपले एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव वाळके यांनी दिली.
सध्या महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. त्याविरोधात शासन सर्वच पातळ्यांवर समर्थपणे उपाययोजना करीत आहे. कोरोनाविरुद्धच्या शासनाच्या या लढाईला पाठबळ देण्याच्या हेतूने पुणे जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी आपला एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे या कठीण प्रसंगी प्राथमिक शिक्षक शासनाच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एकूण १३००० प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांचे एक दिवसाचे वेतन २ कोटी ६० लाख इतके होते. मार्च महिन्यातील एक दिवसाचे हे वेतन देण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्र कार्यकारिणीच्यावतीने या निर्णयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पाठविले आहे.दरम्यान, शाळा बंद झाल्या व प्राथमिक शाळेच्या परीक्षाही रद्द झाल्या असल्या तरी मुलांना अभ्यासक्रमाची गोडी कायम राहावी,यासाठी शाळेच्या स्तरावर विविध मुख्याध्यापक, शिक्षक यांच्याडून ऑनलाईनच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरू करण्यात आले आहेत.त्यासाठी गुगल क्लासरूम, यूट्यूब चॅनल, फेसबुक आणि इ-मेल यासारख्या साधनांचा उपयोग करण्यात येत आहे. त्यातून मुलांना विविध टास्क देण्यात येत असून त्या सोडविल्यावर शिक्षकांकडून तपासून संबंधित विद्यार्थ्यांना पुन्हा शाबासकीची थाप देण्यात येत आहे.