पुणे : श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा होत आहे. यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीदेहू दौऱ्यावर आहेत. या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधानांचे देहूत आगमन झाले आहे. देहूत मोदींचे जंगी स्वागत झाले आहे. आतापर्यंत 50 हजारांपेक्षा जास्त वारकरी देहूत दाखल झाले आहेत. पंतप्रधानांचा उपरणे, पगडी, टाळ, चिपळ्या, तुळशीची माळ आणि वीणा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी रंगमंचावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे भरभरून कौतुक केले. संतांप्रमाणे मोदींनी समाजसेवेला सुरुवात केली असून गोरगरिबांसाठी काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेपण खरे वारकरी आहेत. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रात कर्मकांड सुरु होता. लोकांचे शोषण चालू होते. त्यावेळी भागवत धर्माचा पताका हातात घेऊन संत तुकाराम महाराजांनी समाजसेवेला सुरुवात केली. भजन, कीर्तने यामधून त्यांनी जनजागृती केली. त्याप्रमाणे मोदी आपल्या देशासाठी कार्य करत आहेत. लोकांसाठी आणि रंजल्यागांजल्यासाठी काम करणारे पंतप्रधान आपले खरे वारकरी आहेत. जे काम संतानी समाजासाठी केले. ते पंतप्रधान करत आहेत. भागवत धर्माचा विचार मोदींनी संतांप्रमाणेच सामान्य माणसापर्यंत पोहोचवला. जगभरात त्यांनी आपल्या संतांचे विचार पोहोचवले आहेत.