पुणे : पंतप्रधान पदावर असताना पुण्यात सर्वाधिक वेळा येणारे नरेंद्र मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत. मंगळवारचा त्यांचा पुणे दौरा हा सन २०१४ ते सन २०२३ या नऊ वर्षातला हा त्यांचा ५ वा दौरा ठरणार आहे. त्यांच्या आधी पंडित नेहरू ४ वेळा, इंदिरा गांधी ३ वेळा तर राजीव गांधी २ वेळा पंतप्रधान असताना पुण्यात आले होते. मोरारजी देसाई, पी. व्ही. नरसिंहराव, एच. डी. देवेगौडा, आय. के. गुजराल यांनीही पंतप्रधान असताना पुणे शहराला भेट दिली होती.
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) आणि राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) या पुण्यातील दोन्ही राष्ट्रीय संस्थांचे लोकार्पण पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते झाले होते. एनडीएसाठी ते सन १९५७ आणि एनसीएलसाठी १९५८ मध्ये आले होते. त्यानंतर एकदा रशियाचे पंतप्रधान ख्रुश्चेव यांना घेऊन नेहरू पुण्यात आले होते. टिळक रस्त्यावरून खुल्या गाडीतून त्यांनी नागरिकांना अभिवादन केले होते. त्यानंतरची त्यांची पुणे भेट १२ जुलै १९६१ च्या पानशेतच्या पुरात सर्वस्व हरवलेल्या पुणेकरांच्या सांत्वनासाठीची होती.
खुल्या जीपमधून नेहरूंनी त्यावेळी पूरग्रस्त भागाला भेट दिली. तत्कालीन महापौर रोहिदास किराड यांनी त्यांचे स्वागत केले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण नेहरूंसमवेत होते. डेक्कनवरून जाताना नेहरू यांनी खंडोजीबाबा चौकात थांबून इंटरनॅशनल बुक सर्व्हिसच्या अनंतराव दीक्षितांची विचारपूस केली होती. महापालिकेलाही त्यांनी भेट दिली होती.
मोरारजी देसाईंच्या गाडीसमाेर केली हाेती निदर्शने :
इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांना सन १९७४ मध्ये तत्कालीन पुणे विद्यापीठाने डॉक्टरेट दिली होती. ती घेण्यासाठी त्यांनी पुण्याचा दौरा केला होता. जनता पक्षाच्या सत्ताकाळात पंतप्रधान म्हणून निवड झालेले मोरारजी देसाई यांनीही पंतप्रधान असताना पुण्याचा दौरा केला होता. वसंतदादा पाटील त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यावेळी तत्कालीन काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात टिळक स्मारक मंदिरासमोर निदर्शने करत त्यांची गाडी अडवली होती.
राजीव गांधी दाेन वेळा पुण्यात :
राजीव गांधी पंतप्रधान असताना दोन वेळा पुण्यात आले होते. १६ जून १९८७ ला ते पुण्यात आले होते. मिस्टर क्लीन असलेले तरुण पंतप्रधान अशी त्यांची प्रतिमा होती. त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार होते. काँग्रेस भवनला राजीव गांधी यांची सभा झाली होती. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अधिवेशनासाठी म्हणून ते ७ जानेवारी १९८८ ला परत पुण्यात आले होते. नेहरू स्टेडियमवर त्यांची जंगी सभा झाली होती. दोन्ही वेळा राजीव गांधी यांना मिळालेला युवकांचा प्रतिसाद प्रचंड होता, असे त्यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी असलेल्या संजय बालगुडे यांनी सांगितले.
पी. व्ही. नरसिंहराव यांनीही पंतप्रधान असताना पुणे शहराला भेट दिली होती. त्यांचीही काँग्रेस भवनमध्ये मोठी सभा झाली होती. त्यांच्या हस्ते काँग्रेस भवनात रक्तपेढी व रुग्णवाहिका सेवेचे लोकार्पण करण्यात आले होते. अटलबिहारी वाजपेयी यांनी पंतप्रधान असताना केळकर चौकात आले हाेते. निमित्त हाेते, पुणे विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असलेल्या सुरेश कलमाडी यांच्या प्रचाराचे.
मनमाेहन सिंग, नरेंद्र माेदी यांचा धागा शरद पवार :
मनमोहनसिंग यांनीही त्यांच्या सलग १० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत पुणे शहराला भेट दिली होती. तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हेच त्यांना घेऊन आले होते व आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही शरद पवार हेच पुण्यात घेऊन येत आहेत. मनमोहनसिंग यांचा कार्यक्रम बीएमसीसी (बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय) मध्ये झाला होता.
पंतप्रधान माेदी यांचे पाच दाैरे
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान असताना तब्बल ४ वेळा पुणे शहराचा दौरा केला आहे. स्मार्ट सिटी या केंद्र सरकारच्या योजनेची घोषणा त्यांनी २५ जून २०१६ मध्ये पुण्यातून केली.
- पुणे मेट्रोचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते २४ नोव्हेंबर २०१६ ला झाले. या दोन्ही वेळा महापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत जगताप होते.
- सन २०१९ ला स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांनी निवडणुकीची प्रचारसभा घेतली होती.
- पुणे मेट्रोच्या वनाज ते रामवाडी व पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी या मार्गाचे लोकार्पण ६ मार्च २०२३ राेजी पंतप्रधान माेदी यांनी केले होते.
- आता मंगळवारी ते ५ व्या वेळी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी म्हणून पुण्यात येत आहेत. याही वेळी त्यांच्या हस्ते मेट्रोच्या विस्तारित मार्गाचे लोकार्पण होत असून याही वेळी हा मार्ग अपूर्णच आहे.