पिंपरी : हिंदुस्थान अँटिबॉयोटिक्स (एचए) कंपनी प्रश्नांसंदर्भात केंद्रीय रसायन व खतेमंत्री, अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. यामुळे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ. भेट न दिल्यास त्याच्या कार्यालयासमोर ठिय्या धरण्याचा इशारा एच मजदूर संघाचे अध्यक्ष खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला आहे. तसेच, आंदोलन मागे घेण्याचे आवाहन त्यांनी कामगारांना केले. एचए कंपनी बचाव कृती समितीतर्फे सुरू असलेले कंपनी प्रवेशद्वारासमोरील धरणे आंदोलनाचा सोमवारी १४व्या दिवस होता. आज सायंकाळी झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ समाजवादी नेते भाऊ वैद्य, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, महंमद पानसरे, ज्ञानेश्वर कांबळे, अरुण बोऱ्हाडे, सुनील पाटसकर आदी उपस्थित होते. बारणे म्हणाले, ‘‘गेले १४ दिवस सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची अद्याप केंद्र शासनाने दखल घेतली नाही. तीन महिन्यांच्या वेतनाबाबत रसायनमंत्री अनंत कुमार आणि अर्थमंत्री अरुण जेटली, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसून, केवळ टोलवाटोलवी केली जात आहे. तत्काळ मदत करण्याचे धोरण या मंत्र्यांचे दिसत नाही. कोणी जबाबदारी घेत नाही. कंपनी व्यवस्थापनास दोष देऊन जबाबदारी ढकलण्याचे काम केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात कामगारांशी चर्चा करून उद्या मंगळवारी निर्णय घेण्यात येईल, असे पाटसकर यांनी सांगितले. वैद्य म्हणाले, ‘‘कॉँग्रेसच्या शिष्याप्रमाणे नवे सरकार भांडवलशाही धोरण राबवीत आहे. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत, उद्योजकांना कर सवलत देत आहे. भांडवलशाही धोरण कामगारविरोधी आहे. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी नुकसान भरपाई जाहीर केली. (प्रतिनिधी)
पंतप्रधान मोदींना ‘एचए’प्रश्नी भेटणार
By admin | Published: March 31, 2015 5:28 AM