केडगाव : शिंदे - फडणवीस सरकार कोसळून महाविकास आघाडी सरकार येईल हे विरोधकाचे दिवास्वप्न आहे. हे सरकार कालावधी पूर्ण करेल, असे प्रतिपादन महिला भाजप प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केले. चौफुला तालुका दौंड येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.
यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या की, निर्भयांना दिलेल्या गाड्यांचा वापर शिंदे-फडणवीस सरकार करीत असल्याचा आरोप काहीजण करीत आहेत. आरोप म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाॅटे आहे. २२१ पैकी १२१ गाड्या महाविकास आघाडी शासनाच्या काळात स्वतःच्या हितासाठी वापरल्या गेल्या. आदित्य ठाकरे यांच्या परळी मतदारसंघात त्यापैकी १७ गाड्या दिल्या. त्यामुळे विरोधकाकडून आम्ही गाड्या वापरत असल्याचा आरोप हास्यास्पद असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
सरकारला बदनाम करायचे काम चालू आहे. डॉ. आंबेडकरांनी आम्हा महिलांना मतदानाचा अधिकार दिला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे झाली तरी महिलांना शौचालय नव्हते. मोदी सरकारने घराघरांत शौचालय दिले. गॅस सिलिंडर घराघरांत दिले. कोरोना महामारीमध्ये जग ठप्प होते. प्रत्येक भारतीयांना जगविण्याचे काम मोदींनी केले. १३० कोटी जनतेचे लसीकरण करण्यात आले. २०१९ निवडणुकीत मोदींचे हात बुलंद मातृशक्तीने केले आहेत. भाजप जिल्हाध्यक्षा कांचन कुल म्हणाल्या की, भीमा पाटस कारखाना सुरू करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोलाचे सहकार्य लाभले आहे. तसेच महिलांना महिलांचे सहकार्य लाभल्यास निश्चित क्रांती घडेल, असा विश्वास कुल यांनी व्यक्त केला. याप्रसंगी माजी आमदार रंजना कुल, आमदार राहुल कुल, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कांचन कुल, नामदेव बारवकर, माऊली ताकवणे, हरिश्चंद्र ठोंबरे, आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कांचन कुल यांची लक्षवेधी कामगिरी
चित्रा वाघ म्हणाल्या की, कांचन कुल या नवख्या उमेदवार होत्या. समोर तुल्यबळ उमेदवार असतानासुद्धा कांचन कुल यांनी ऐनवेळी लोकसभा निवडणुकीसाठी साडेपाच लाख मते घेतली. कुल कुटुंबाची हीच कामाची पावती आहे. हाच विश्वास व प्रेम कुल कुटुंबावर कायम असू देत, असे आवाहन त्यांनी महिलांना केले.