पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे दाैऱ्यावर येणार आहेत. २९ एप्रिल रोजी त्यांचा पुणे दाैरा असणार आहे. पंतप्रधानांची सभा आणि रोड शो होणार आहे. तसेच ते एकदिवसीय मुक्कामासाठी राजभवन येथे असणार आहेत. या कालावधीत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवला जाणार आहे. मोदींच्या आगमनाचे ठिकाण, सभास्थळ, रोड शोच्या मार्गावरील सुरक्षेची सोमवारी (दि. २२) पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पाहणी केली. यावेळी अप्पर पोलिस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, प्रवीण पाटील, मनोज पाटील, उपायुक्त संदीपसिंह गिल, रोहिदास पवार, विक्रांत देशमुख, हिंमत जाधव यांची उपस्थिती होती.
पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी पाच हजार पोलिसांचा फाैजफाटा तैनात असणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले एसपीजीची (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) पथके, एसआपीएफ, फोर्स वनचे जवान बंदोबस्तावर असणार आहेत. कार्यक्रमस्थळाची बॉम्बशोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाने पाहणी केली आहे. पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर २९ एप्रिल रोजी सायंकाळी सभा होणार आहे. यानिमित्त पुण्यात तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे
महायुतीच्या वतीने या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी साधारण एक लाख नागरिक येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सभेसाठी येणारे नागरिक मोठ्या प्रमाणात वाहने घेऊन येत असतात. त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची गैरसोय टाळण्यासाठी जागेबाबत लवकरच सूचित करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. सभेच्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित राहायचे असेल तर त्यांना मोबाइलव्यतिरिक्त कुठलीही वस्तू आपल्यासोबत बाळगता येणार नाही. येणाऱ्या सर्व नागरिकांची कसून तपासणी करण्यात येईल. वाढत्या उन्हाची दाहकता पाहता सभामंडपात पिण्याच्या पाण्याची व्यवस्थादेखील करण्यात येणार आहे.