शिक्रापूर (पुणे) : पिंपळे जगताप येथे दीड तासांच्या पंतप्रधानांच्या संवादात इयत्ता दहावी-बारावीची मुले मजेशीर प्रश्नोत्तरांनी भारावली. यावेळी परीक्षेवेळी उत्तरेच विसरतो काय करावे? शालेय परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा यात प्राधान्य कुणाला द्यावे? ऑनलाईनमुळे आम्हाला अभ्यासातून भरकटल्यासारखे वाटते काय करावे? असे एक ना अनेक प्रश्न पिंपळे-जगताप (ता. शिरूर) येथील नवोदय विद्यालयातील इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांना विचारले. मोदींनीही अनेक शाब्दीक कोट्या आणि मजेशीर संवाद साधत विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देत ‘परीक्षा पे चर्चा’ या दीड तासांच्या ऑनलाईन संवाद कार्यक्रमात रंगत आणली.
‘परीक्षा पे चर्चा’ या संपूर्ण देशभरातील विद्यार्थ्यांसाठीच्या आजचा ऑनलाईन संवाद कार्यक्रमात सकाळी १० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही स्क्रीनवर ‘नमस्ते विद्यार्थी मित्रांनो’ असे म्हणत विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांशी संवाद सुरू केला. यावेळी देशभरातील मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. एकामागून एक अशा सुमारे ८० ते ८५ प्रश्नांना यावेळी पंतप्रधानांनी उत्तरे दिली. आनंदाने अभ्यासात रमावे, परीक्षेसाठी नाही तर ज्ञान वाढविण्यासाठी अभ्यास करावा, अभ्यास करावासा वाटणे हीच अभ्यासाची उत्तम वेळ, पालकांच्या अपेक्षांचा विचार न करता अभ्यासक्रमावर लक्ष द्यावे, ऑनलाईन अभ्यासावेळी किती वेळ इतर ठिकाणे भरकटलात, याचा विचार करून यापुढे ऑनलाईन शिक्षण पद्धतीत रमावे अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरांनी मोदींनी विद्यार्थ्यांना हसत खेळत परीक्षेला सामोरे जाण्याबद्दल सांगितले व शुभेच्छाही दिल्या.
दरम्यान, पिंपळे-जगताप येथील विद्यालयात यावेळी सुमारे ५४१ विद्यार्थी, ४० शिक्षक, १५ विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचा समारोप माजी पंचायत समिती सदस्य भगवानराव शेळके व सरपंच एस. व्ही. नाईकनवर यांच्या उपस्थितीत झाल्याची माहिती प्राचार्य बी. आर. खेडकर यांनी दिली. कार्यक्रमाचे आयोजन सुभाष लष्करी, एस. डी. वाघमारे, वंदना सुरवसे, उपप्राचार्य एस. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. एस. बी. पठारे यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य बी. आर. खेडकर यांनी आभार मानले.
दरम्यान काही मोजकी प्रश्नोत्तरे पुढीलप्रमाणे -
प्रश्न : कितीही अभ्यास केला तरी परीक्षेत ऐनवेळी विसरतो यावर उपाय काय?
उत्तर : अभ्यास करतानाच आनंदात आणि पूर्ण लक्ष देऊन त्यामध्ये पूर्ण समरस होऊन केल्यास पुन्हा विसरण्याचा प्रश्नच येत नाही.
प्रश्न : वार्षिक परीक्षा आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा यामध्ये कुठल्या परीक्षेवर भर द्यायचा?
उत्तर : आपण खरंतर परीक्षेसाठी अभ्यास करायचा नाही, तर आपलं ज्ञान वाढावं, ते आत्मसात व्हावे यासाठी अभ्यास केल्यास सगळ्या परीक्षा सोप्या असतात.
प्रश्न : अभ्यासासाठी सर्वात चांगली वेळ कोणती?
उत्तर : आपल्याला ज्यावेळी अभ्यास करण्याची इच्छा होते व मन लागते ती वेळ सगळ्यात चांगली.
प्रश्न : पालक आणि शिक्षक यांच्या अपेक्षा व त्यांचं ओझं कसं हाताळाव?
उत्तर : आपल्यामध्ये असलेल्या गुणांना ओळखून त्यावर काम करत राहिल्यास एक दिवस आपले पालक आणि शिक्षक यांना आपल्या निकालावर नक्की अभिमान वाटतो.
प्रश्न : मधल्या काळात ऑनलाईन शिक्षणामुळे मुले भरटकली, असे वाटते त्यांनी काय करावे?
उत्तर : प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःला प्रश्न विचारावा की आपण ऑनलाईन वाचन करत असताना दुसऱ्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवतो का? तसे असल्यास लगेच सावरून अभ्यासावर यावे.