पुणे : बाळासाहेब ठाकरे यांचे एआय भाषण मी ऐकले, संपूर्ण ऐकले. त्यांचे विचार नेहमीच ऐकत आले; मात्र, नाशिकमधील त्या एआय भाषणात त्यांनी काँग्रेसवर केलेली टीका, श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकावण्याची त्यांची इच्छा हे काहीच नव्हते, अशी सावध प्रतिक्रिया डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. बाळासाहेबांची ती सगळी स्वप्ने मोदी यांनी पूर्ण केली, त्यांच्याबरोबर आमचे नेते एकनाथ शिंदे आहेत, तेच बरोबर आहेत, असे त्या म्हणाल्या.
शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या महिला मेळाव्यासाठी डॉ. गोऱ्हे पुण्यात आल्या होत्या. नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने त्यांच्या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांचे ‘एआय’मध्ये तयार केलेले भाषण ऐकविले. त्याविषयी विचारले असता अतिशय सावधपणे त्या व्यक्त झाल्या. बाळासाहेबांची अनेक भाषणे मीही ऐकलीत. ते आम्हाला नेहमीच वंदनीय, आदरणीय आहेत. त्यांचे विचार स्पष्ट होते. या भाषणात ते सर्व नव्हते. त्यांची जी स्वप्ने होती ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली. ज्यांनी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार ऐकलेत त्यांची खात्री पटेल की एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांच्या मार्गावर बरोबर आहेत. बाळासाहेबांच्या विचारांचा सागर सर्वांसाठी खुला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत न्यायालयाचा निर्णय काय तो होईलच; मात्र, युती किंवा कसे याबाबतचा निर्णय युतीतील वरिष्ठ नेत्यांनी करायचा आहे. बरेचदा कार्यकर्ते त्यांची मते व्यक्त करीत असतात; मात्र, नेत्यांच्या स्तरावरचा निर्णय महत्त्वाचा असतो. त्यामुळे ते ठरवतील. पुण्यात आमचे दोन आमदार आहेत, महापालिकेतही आमचे नगरसेवक होते. आमच्यासमोर काही अडचण नाही.
आताच्या महिला मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी सभासद नोंदणी करण्यास सांगितले आहे. त्यासाठी हा मेळावा होता. मेळाव्यातील महिलांनी आता ‘शिवसेनादूत’ म्हणून काम करावे, जास्तीतजास्त सदस्य नोंदवून घ्यावेत. त्याप्रमाणे आता काम सुरू होईल.