Chandrakant Patil: पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच सच्चे भारतीय अन् हिंदुत्ववादी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 08:35 PM2021-12-13T20:35:50+5:302021-12-13T20:54:49+5:30
मोदीजींनी अयोध्येतील राम मंदिराचा विषय मार्गी लावला आहे. केदारनाथ येथे शंकराचार्याचा पुतळा उभारून समाधीचे काम केले आहे तसेच मंदिर परिसरात मोठी विकास कामे केली आहेत. ते एका पाठोपाठ एका मंदिराचे काम करत आहेत. हा त्यांचा भावनिक अजेंडा आहे.
पुणे : नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी येथील विश्वनाथ मंदिराच्या परिसरातील भव्य विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम पार पडला. पुण्यात हडपसर परिसरात मांजराई देवी मंदिराच्या आवारातया कार्यक्रमाची मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोदींचे भरभरून कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सच्चे भारतीय आणि सच्चे हिंदुत्ववादी असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.
पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सच्चे भारतीय आणि सच्चे हिंदुत्ववादी आहेत. काशीला गंगेत स्नान करून विश्वनाथ मंदिरात दर्शनाला येताना प्रचंड गर्दी होत होती आणि मंदिराभोवती प्रदूषण व सांडपाणी होते. ते हटविण्याचा संकल्प त्यांनी पूर्ण केला. आता मंदिराच्या भोवती पाच लाख चौरस फुटांचा सुंदर परिसर निर्माण झाला आहे. भाविकांना मोकळेपणाने वावरण्यासाठी जागा आहे. गंगेत स्नान करून भाविक थेट मंदिरात येऊ शकतात. मोदीजींनी अयोध्येतील राम मंदिराचा विषय मार्गी लावला आहे. केदारनाथ येथे शंकराचार्याचा पुतळा उभारून समाधीचे काम केले आहे तसेच मंदिर परिसरात मोठी विकास कामे केली आहेत. ते एका पाठोपाठ एका मंदिराचे काम करत आहेत. हा त्यांचा भावनिक अजेंडा आहे.
राहुल गांधी यांचे वक्तव्य त्यांचा संभ्रम दर्शवतो
''राहुल गांधी यांचे वक्तव्य त्यांचा संभ्रम दर्शवतो. हिंदू आणि हिंदुत्ववादी यात काय फरक आहे? हिंदू धर्म म्हणजे विशिष्ट एकच पूजा पद्धती नाही, तर हिंदू हा गुणवाचक शब्द आहे. जो हिंदू तत्त्वज्ञानाचा आग्रही असतो तो हिंदुत्ववादी असतो. या देशात हिंदू समाजात वेगवेगळ्या पूजा पद्धती निर्माण झाल्या आणि मंदिरे निर्माण झाली. त्यावर मोगलांनी आक्रमण केले. राहुल गांधी स्वतःला हिंदू म्हणत असतील तर त्यांनी मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध केला पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.''