पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुण्यात होणार ‘जीतो कनेक्ट’चे उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 12:45 PM2022-05-05T12:45:35+5:302022-05-05T12:45:53+5:30
पुणे : देशाच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जीतो पुणे) वतीने ‘जीतो कनेक्ट ...
पुणे : देशाच्या स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्ताने जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जीतो पुणे) वतीने ‘जीतो कनेक्ट २०२२’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या ६ ते ८ मे यादरम्यान ही परिषद पुण्यात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. ६) रोजी सकाळी ९.३० वाजता दृकश्राव्य माध्यमाद्वारे या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत.
जीतो ॲपेक्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, जीतो पुणेचे अध्यक्ष ओमप्रकाश रांका आणि जीतो कनेक्टचे समन्वयक राजेश सांकला यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तीन दिवसांच्या या परिषदेमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित ७६ वक्ते सहभागी होणार आहेत. व्यापार, उद्योग, प्रेरणा, फॅशन, अर्थकारण, स्टार्टअप आदी अनेक विषयांवर व्याख्याने, चर्चासत्र, कार्यशाळा होणार आहेत. तसेच, ट्रेड फेअर आणि आणि जैन धर्माची परंपरेचे दर्शन घडविणारे जैन पॅव्हेलियन यांचाही यामध्ये समावेश असणार आहे. जीतो पुणेचे मुख्य सचिव पंकज कर्नावट, चेतन भंडारी, कांतिलाल ओसवाल, रमेश गांधी, इंदर छाजेड, इंदर जैन उपस्थित होते.
गंगाधाम चौक ते कात्रज कोंढवा रस्त्यावरील राजयोग लॉन्स येथे ही ‘जीतो कनेक्ट २०२२’ ही पेक्षाही मोठी आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. पाच लाखांहून अधिक उद्योजक व व्यापाऱ्यांची उपस्थिती यावेळी अपेक्षित आहे. सुमारे १५ लाख चौरस हेक्टर जागेत परिषदेचे आयोजन केले जाणार आहे. ४० हजार चौरस फुटांत जैन पॅव्हेलियन असणार आहे. याठिकाणी ६५०० बैठक व्यवस्था असलेले एक मुख्य सभागृह आणि ६०० बैठक व्यवस्था असलेले तीन सभागृह असणार आहेत. तसेच या परिषदेसाठी मोफत प्रवेश असून, पाच लाखांहून अधिक उद्योजक व व्यापारी याठिकाणी येतील, असा अंदाज आहे. जागेची मर्यादा लक्षात घेता, त्यासाठी उपस्थित राहण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नाव नोंदणी connect2022.jito.org या संकेतस्थळावर जाऊन करता येईल. येणाऱ्या प्रत्येकासाठी व्यवस्था व्हावी म्हणून गाडी पार्किंगची २.२५ लाख चौरस फूट जागेत व्यवस्था करण्यात आली आहे.