लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यांनी लॉकडाऊन टाळावा, असा सल्ला देणारे पंतप्रधान मोदींचे हे शहाणपण त्यांनी संपूर्ण देशात विनासूचना लॉकडाऊन जाहीर केला तेव्हा कुठे गेले, होते असा सवाल काँग्रेसने केला आहे.
प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी म्हणाले की, मोदी यांनी मंगळवारी केलेला संवाद राष्ट्रप्रमुख म्हणून जबाबदारी टाळणारा होता. राज्य त्यांच्या ताकदीने कोरोनाचा सामना करतच आहेत, त्यांना केंद्र सरकारने मदत करणे अपेक्षित आहे. ती करायची सोडून आता मोदी एकदम राज्यांनी लॉकडाऊन टाळावा अशा सल्लागाराच्या भूमिकेत आले.
भारतात तयार झालेल्या लशी १८२ देशांत निर्यात करण्यास परवानगी देऊन मोदी विश्वगुरू व्हायला पाहत आहेत. मात्र, येथे भारतीय अपुऱ्या आरोग्य साधनांसह कोरोना महामारीबरोबर लढत आहेत ते त्यांना दिसत नाही. राष्ट्रीय आपत्ती असतानाही ते राज्यांवर जबाबदारी टाकत आहेत हे चूक आहे, असे तिवारी म्हणाले.