पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पीएचडी रिसर्च गाईड होण्यासाठी एका प्राचार्याने वाड्.मयचौर्य केले असल्याची तक्रार विद्यापीठाकडे आली आहे. त्यावर विद्यापीठाने संबंधित प्राचार्याचे संशोधन तपासण्याचा निर्णय घेतला असून, त्यास विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. जी. चासकर यांनी दुजोरा दिला आहे.
देशात शैक्षणिक संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण संशोधन होणे गरजेचे आहे. मात्र, पीएचडीसह विविध रिसर्च पेपरमध्ये मोठ्या प्रमाणावर वाड्.मयचौर्य होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांसह सर्व शैक्षणिक संस्थांनी वाड्.मय चौर्य शोधण्यासाठी सॉफ्टवेअर विकत घ्यावेत, अशा सूचना दिल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना पीएच.डी.पदवी देण्यापूर्वी त्यांचे संशोधन सध्या ‘उरकुंड’या सॉफ्टवेअरमधून तपासले जात आहे. त्यामुळे विद्यापीठाने पूर्वीपासूनच संशोधनाच्या गुणवतेबाबत काळजी घेतली आहे.
सुस-पाषाण रस्ता, नांदे येथील आयएसबीएम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. पंकजकुमार श्रीवास्तव यांना विद्यापीठाने पीएच.डी. रिसर्च गाईड म्हणून मान्यता दिली आहे. परंतु,श्रीवस्तव यांनी पीएच.डी. रिसर्च गाईड होण्यासाठी सादर केलेले संशोधन दुस-याचे असल्याचा दावा विद्यापीठाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीमध्ये केला आहे. त्यामुळे संबंधित संशोधनाची तपासणी करणा-याचे काम विद्यापीठातर्फे अॅण्टी प्लॅगेरिझम (इथिकल) समितीकडे दिले जाणार आहे.
--------------------------------------------
विद्यापीठाकडे प्राचार्य पंकजकुमार श्रीवास्तव यांच्या संशोधनाबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. त्यामुळे श्रीवास्तव यांना विद्यापीठात बोलवून या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली व त्यांच्याकडून याबाबत लेखीसुध्दा घेतले आहे. विद्यापीठाकडून संशोधनाच्या गुणवत्तेबाबत कधीही तडजोड केली जात नाही. त्यामुळे त्यांचे संशोधन इथिकल कमिटीकडे तपाासणीसाठी दिले जाणार आहे.
- डॉ. एम. जी. चासकर, अधिष्ठाता, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
----------------------------------
गुणवत्ता तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा
विद्यापीठ अनुदान आयोगाने संशोधनाची गुणवत्ता तपासण्यासाठी पुणे विद्यापीठाकडे ‘इथिकल सेल’ची जबाबदारी दिली असून, या सेलकडून वेस्टन झोनमधील शैैक्षणिक संस्थांचे संशोधन तपासले जाते. विद्यापीठाकडे यासाठी स्वतंत्र व सक्षम यंत्रणा उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या नजरेतून वाड्.मयचौर्य सुटणार नाही, असे तज्ज्ञांकडून सांगितले.
--------------------------