पुणे : शैक्षणिक आणि प्रशासकीय नेतृत्व गुणांच्या जोरावर प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी गेल्या दहा वर्षांत बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी)च्या संपन्नतेची मालिका चालू ठेवली. विकास आणि विस्ताराचे आव्हान सातत्यपूर्ण प्रयत्नांतून पेलून दाखवले आणि महाविद्यालयाला विकसित टप्प्यावर आणून ठेवले,” असे गौरवोद्गार शिक्षण तज्ञ आणि ‘बीएमसीसी’चे माजी प्राचार्य डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांनी काढले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) ‘बीएमसीसी’चे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांच्या सेवानिवृत्तीबद्दल महाविद्यालयाच्यावतीने गुरुवारी (दि. ३१) त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. देशपांडे बोलत होते. डीईएसच्या नियामक मंडळचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष महेश आठवले, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
डॉ. कुंटे म्हणाले की, डॉ. रावळ यांच्या सारख्या ताकदीची विविध माणसे डेक्कन एज्युकेशन सोसायटीत विविध पदांवर कार्यरत असल्याने संस्था पुढे आली आहे. प्राथमिक शाळांपासून उच्च शिक्षणापर्यंत नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आणि माजी विद्यार्थी संपर्क वाढविण्यासाठी विद्यार्थी प्रिय प्राध्यापक डॉ. रावळ यांचा सोसायटी उपयोग करुन घेणार आहे.
डॉ. रावळ म्हणाले, “येणारे दिवस कसोटीचे आहेत. शासनाकडून फार अर्थसहाय्य मिळेल असे नाही. पदांची भरती होत नाही. किफायतशीर शुल्क आकारुन शिक्षण देण्याचे संस्थापकांचे सामाजिक भान कायम राखायचे आहे. विद्यार्थ्यांना तत्काळ आणि नाविन्यपूर्ण सेवा द्यायची आहे. त्यासाठी नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी लागेल.” विविध विभागप्रमुख आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्राचार्य रावळ यांच्याबद्दलचे मनोगत व्यक्त केले. भारती पवार यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे यांनी प्रास्ताविक केले.
चौकट
डॉ. पुरोहित यांच्याकडे ‘प्रभारी’ धुरा
‘डीईएस’च्या किर्ती महाविद्यालयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका डॉ. सीमा पुरोहित यांच्याकडे ‘बीएमसीसी’च्या प्रभारी प्राचार्य पदाचा पदभार डॉ. चंद्रकांत रावळ यांनी यावेळी दिला.