पुणे : विधवा व मागासवर्गीय महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणात सासवड पोलिसांनी अटक केलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरंदर (सासवड) दिवेच्या प्राचार्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश सहारे यांनी हा आदेश दिला. विनयभंग, ॲट्राॅसिटीच्या कलमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
आनंद कोंडिबा शिगळे (वय ४३, रा. चिंचवड) असे त्याचे नाव आहे. बचाव पक्षातर्फे ॲड. विवेक भरगुडे, ॲड. प्रसाद भरगुडे, ॲड. वैशाली मुरळीकर आणि ॲड. कुमार पायगुडे यांनी काम पाहिले. याबाबत ३१ वर्षीय महिलेने फिर्याद दिली. त्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील कर्मचारी असून, शिगळे प्राचार्य आहेत. फिर्यादीला अश्लील भाषेत बोलून त्यांचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अटक करून शिगळे याला न्यायालयात हजर केले. संस्था, महाविद्यालयाच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्यानुसार समिती असते. त्या समितीला या घटनेबाबत माहिती देण्यात आलेली नाही. या समितीतील अधिकाऱ्यांनी कामाचे नियम न पाळणे, कोविडचे नियम पाळत नसल्याने कारणे दाखवा नोटीस महिलेला पाठवली आहे. त्यामुळे खोटी तक्रार देण्यात आली आहे. येथे ॲट्रॉसिटी लागू होत नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे ॲड. विवेक भरगुडे यांनी केला.