-चतुरंग प्रतिष्ठानचा विशेष सन्मान
पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्यावतीने देण्यात येणारा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान यावर्षी वक्ते डॉ. यशवंत पाटणे (सातारा) यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्रवण संस्कृती समृद्ध करण्यासाठी गेली ४७ वर्षे प्रयत्नशील राहिलेल्या मुंबईच्या चतुरंग प्रतिष्ठानचा यावर्षी विशेष सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. प्रतिवर्षी हे सन्मान प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या जयंतीदिनी १५ जुलै रोजी समारंभपूर्वक प्रदान केले जातात. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
प्रा. जोशी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीची स्थापना करण्यात आली. चार दशकांहून अधिक काळ निष्ठेने डॉ. यशवंत पाटणे यांनी लेखनातून आणि व्याख्यानातून विचारजागर केला. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना डॉ. पाटणे यांच्याविषयी विशेष आपुलकी होती.’’