बारामती : माळेगाव सहकारी साखर कारखाना संचलित शिवनगर विद्या प्रसारक मंडळाच्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी अॅन्ड इंजिनिअरिंग या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र मोहन वाबळे यांच्या प्राचार्यपदाची मान्यता तंत्रशिक्षण संचालकांनी पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केली आहे. यासंदर्भात राष्ट्रीय समाज पक्षाचे केंद्रीय सचिव दशरथ राऊत यांनी तब्बल ९ वर्षे पाठपुरावा केल्यानंतर हा आदेश दिला आहे. या संस्थेचे माजी केंद्रीय मंत्री शरद पवार तहहयात अध्यक्ष आहेत. त्यांच्या नावाचा गैरवापर करून तत्कालीन उपाध्यक्ष, विश्वस्त, कारखान्याचे संचालकांनी नियमबाह्य काम केले आहे, असा आरोप राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केला. या वेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष संदीप चोपडे, प्रवक्ता विष्णू चव्हाण उपस्थित होते. राऊत यांनी या संस्थेच्या अंतर्गत सुरू असलेल्या महाविद्यालयांच्या बाबत तक्रारी केल्या आहेत. त्यामध्ये शासकीय बिंदूनियमावलीनुसार ५१ टक्के आरक्षित जागांवर मागासवर्गीय, विमुक्त भटक्या, इतर मागासवर्गीयांच्या जागा भरलेल्या नाहीत. ९ वर्षांपूर्वी राऊत यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर माहिती अधिकाराचा वापर करून सर्व माहिती संकलित केली. त्यांच्या तक्रारीनुसार शासनाने चौकशी समिती नेमली. त्याच्या अहवाल समितीने सादर केला. मात्र, त्यावर कार्यवाही करण्यात आली नव्हती. समितीने सादर केलेल्या अहवालाची अंमलबजावणी करण्याचे आदेश १९ मार्च २०१५ आणि २८ मार्च २०१५ रोजी दिले होते. या आदेशाला अनुसरून प्राचार्य वाबळे यांना खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी सादर केलेला खुलासा अमान्य करण्यात आला. सन १९९३ च्या अध्यादेशानुसार पूर्वलक्षी प्रभावाने राजेंद्र वाबळे शैक्षणिक पात्रता व अनुभव धारण करीत नसल्यामुळे प्राचार्यपदाच्या १९९७ च्या नियुक्तीस ११ जून १९९८ अन्वये दिलेली मान्यता पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येत असल्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)
शिवनगर विद्या प्रसारकच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्यपद रद्द
By admin | Published: March 04, 2016 12:32 AM