पुणे : खराडी भागात कॉल सेंटर सुरू करून अमेरिकन नागरिकांना गंडा घालणा-या दोघांना सायबर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली. पोलिसांनी कॉल सेंटरमधून १७ हार्डडिस्क, चार मोबाइल संच, पेनड्राइव्ह असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडे १० हजार अमेरिकन नागरिकांची माहिती आढळून आली आहे.या प्रकरणी सुधीर पोपटभाई उलभगत (वय २४,रा. सोलापूर) आणि विकास नरेंद्र शुक्ला (वय २५, रा. अहमदाबाद, गुजरात) यांना अटक करण्यात आली. खराडी भागातील एका इमारतीत आरोपी उलभगत, शुक्ला यांनी कॉलसेंटर सुरू केले होते. आरोपी अमेरिकेतील नागरिकांनी संपर्क साधून त्यांची फसवणूक करत असल्याची माहिती सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी कॉलसेंटरवर छापा टाकून आरोपींना अटक केली.उलभगत शिक्षणासाठी अहमदाबाद येथे गेला होता. तेथे दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी खराडी भागात कॉलसेंटर सुरू केले होते. अमेरिकन नागरिकांना खासगी वित्तीय संस्थेतून बोलत असल्याची बतावणी आरोपी करायचे. कर्ज मिळवून देण्याच्या आमिषाने दोघांनी अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. त्यांच्याकडे दहा हजार अमेरिकन नागरिकांची माहिती आढळून आली आहे. पोलीस उपायुक्त संभाजी देशमुख, सहाय्यक आयुक्त निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पायगुडे, उपनिरीक्षक सागर पानमंद, सागर पडवळ आणि पथकाने ही कारवाई केली.
अमेरिकन नागरिकांना गंडा घालणाऱ्या कॉल सेंटरवर छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 8:48 AM