नीरा : नीरा शहरातील श्री गणेश दूध संकलन केंद्रावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने सहआयुक्त संजय नारगुडे यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकून कारवाई केली. यात दुधाचे नमुने तपासणीसाठी घेऊन १३८ किलो व्हेपरमिट पावडरचा सुमारे ८१ हजार ५८० रुपये किमतीचा साठा या पथकाने जप्त केला आहे. हे केंद्र विनापरवाना असल्याचे तपासणीतून निदर्शनास आले आहे. केंद्रातील २ हजार १८० लिटर दूध नाशवंत असल्याने ते नष्ट करण्यात आले आहे. पथकाने घेतलेल्या दुधाच्या नमुन्याची प्रयोगशाळेत तपासणी करून अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारगुडे यांनी सांगितले. या कारवाईत सहआयुक्त संजय नारगुडे, अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप फावडे, युवराज डेंबरे, अविनाश वाभाडे, देवानंद वीर यांच्या पथकाने सहभाग घेतला. नीरा शहरात अल्पावधीत मोठी उलाढाल करून भव्य इमारतीत सुरू झालेल्या या केंद्रावर टाकलेल्या छाप्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्याचप्रमाणे केंद्रावर दररोज दूध खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये उलटसुलट चर्चा होत होती. तर, काही ग्राहक तीव्र संताप व्यक्त करीत होते. (वार्ताहर)
नीरा येथे दूधसंकलन केंद्रावर छापा
By admin | Published: February 27, 2016 4:27 AM