पुणे : संमेलनाध्यक्षांचे भाषण छापण्याचा निर्णय महामंडळाच्या बैठकीमध्ये होईल, अशी भूमिका घेणाऱ्या साहित्य महामंडळाने अखेर भाषण छापण्यास दिले आहे. तरीही महामंडळावर अविश्वास दर्शवीत भाषण छापून हातात पडले, तर ‘प्रकाशन’ नाही, तर ‘उपोषण’ असा पवित्रा संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सोमवारी घेतला आहे. महामंडळाने जाणीपूर्वक भाषण ‘सेन्सॉर’ करीत संमेलनाध्यक्षांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली, असा सबनीस यांचा आरोप आणि भाषण वेळेत न मिळाल्यामुळे ते छापणे अशक्य असल्याचे महामंडळाचे स्पष्टीकरण, हा वाद गाजला. त्यातच मंगळवारपर्यंत भाषण छापले नाही, तर बुधवारपासून मसाप कार्यालयाबाहेर उपोषणाचा इशारा सबनीस यांनी दिला. त्यामुळे महामंडळाने भाषण छापायला दिले. आपण खान्देशच्या दौऱ्यावर असताना महामंडळाचे पत्र घरी आले. त्यामध्ये भाषण छापण्याचा निर्णय हा धोरणात्मक आहे, त्यावर महामंडळाच्या मार्चच्या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येईल, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. भाषण छापले तर चांगलेच आहे. महामंडळाच्या भाषण प्रतीसह सह्याद्री फाउंडेशन आणि साहित्यवेध प्रतिष्ठानने ज्या ११०० प्रती छापल्या आहेत, त्याचे प्रकाशन सामान्य माणसाच्या हस्ते करेन, नाहीतर ‘उपोषण’ करेन. (प्रतिनिधी)
छापले तर प्रकाशन, अन्यथा उपोषण
By admin | Published: January 26, 2016 1:46 AM