मुंबई : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कारचालकाला हटकल्याच्या रागात त्याने कर्तव्यावर असलेल्या पोलीस महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याची धक्कादायक घटना नेहरू नगर जंक्शन येथे घडली. या प्रकरणी जॉर्ज ऊन्नी चलपुरम (८३) याच्यासह त्याचा चालक राहुल सुभाष चंदनशिवे (२६) याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतरही जॉर्जने स्वत:ला कर्नल असल्याचे सांगून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत ओळख असल्याचे सांगून पोलिसांना धमकाविण्याचा प्रयत्न केला.
चेंबूर वाहतूक विभागात तक्रारदार महिला पोलीस कार्यरत आहेत. शुक्रवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास त्या नेहरू जंक्शन येथे कर्तव्यावर होत्या. चलपुरम याची कार कामगार नगरकडे उजवीकडे वळण घेत होती. त्याला थांबण्याचा इशारा केला, परंतु तो थांबला नाही. कुर्ला स्टेशनकडून नेहरू नगर जंक्शनकडे जाणाºया वाहिनीवरील गाड्या चालू होत्या.
सदरचा सिग्नल हा कायमस्वरूपी फ्लॅशरवर असतो त्यामुळे मनुष्यबळाचा वापर करून येथील वाहतूक नियमित केली जाते. त्यावरूनच चलपुरमने इथे कुठेही सिग्नल नाही असे बोलून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. मोठमोठ्या पोलीस अधिकाºयांशी ओळख असल्याची धमकी देत त्यांच्या युनिफॉर्मवरील नेमप्लेट खेचली. शिवाय, ‘तुमची औकात काय आहे?’ असे बोलून त्यांना धक्काबुक्की केली. अखेर जमलेल्या जमावानेही त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची दादागिरी चालूच असल्याने नेहरू नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि चलपुरमसह त्याच्या चालकाला बेड्या ठोकल्या. त्याच्याविरुद्ध विनयभंगासह सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ सारखे गुन्हे दाखल करीत त्याला अटक केली आहे. नेहरू नगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.असाही प्रताप...चलपुरम हा चेंबूरच्या गौटन रोड येथील मीरा इमारतीत राहतो. तो वरिष्ठ अधिकाºयांसोबत ओळख असल्याचा आव आणत यापूर्वीही पोलिसांचे व्हिडीओ काढणे, अथवा दमदाटी करीत असल्याचीही माहिती समोर येत आहे. या प्रकरणीही पोलीस अधिक तपास करीत आहेत.