सचिन दिवाण
पुणे : बांगला देशात सोमवारी झालेल्या सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ईशान्येकडील राज्यांत घुसखोरीची शक्यता असून, ती रोखण्यास प्राधान्य देणे गरजेचे असल्याचे मत निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी व्यक्त केले.
बांगलादेश मुक्तीसाठी १९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात पित्रे यांचा सहभाग होता. त्याचा संदर्भ देत पित्रे म्हणाले की, वर्ष १९७१ मध्ये जेसोर येथे झालेल्या पाकिस्तानी सैन्याच्या शरणागती कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्यावेळी तत्कालीन पूर्व पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांनी केलेल्या कत्तली आम्ही पाहिल्या आहेत. आताही बांगलादेशातील सत्तांतरामागे त्याच विचारांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी) आणि जमात-ए-इस्लामी यांचा हात आहे. वंगबंधू शेख मुजिबुर रहमान यांच्या पुतळ्याची विटंबना होताना पाहणे दु:खद आहे. तेथे लोकशाही परतणे गरजेचे आहे.
बांगला देश आणि भारतीय जनतेचे पूर्वापार आणि घनिष्ठ संबंध राहिले आहेत. भाषा आणि संस्कृती हे दोन्ही देशांना बांधणारे महत्त्वाचे घटक आहेत. बांगला देशातील परिस्थितीचा भारतावर नक्कीच परिणाम होईल. आता बांगला देशातून भारतात घुसखोरी होण्याची अधिक शक्यता आहे. त्याकडे प्राधान्याने लक्ष दिले पाहिजे, असे मत पित्रे यांनी व्यक्त केले. तसेच बांगला देश स्वतंत्र झाला तेव्हा तेथे १८ टक्के हिंदू होते. आता त्यांची संख्या ३ टक्क्यांवर आली असल्याचे सांगत या हिंदूंच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
बांगला देशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना भारतात आल्या आहेत. त्या पुढे ब्रिटनमध्ये राजकीय आश्रय घेणार असल्याची चर्चा आहे. त्यावर पित्रे म्हणाले की, शेख हसीना यांना दीर्घकाळ आश्रय देणे भारत किंवा ब्रिटनसाठी अडचणीचे ठरू शकते. त्यांनी अधिक तटस्थ देशात जाणे जास्त योग्य ठरेल, असेही पित्रे म्हणाले. बांगला देशात चीन आणि अमेरिकेचे हितसंबंध गुंतले असल्याने तेथील घडामोडींमागे या दोन देशांचा हात असण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. तसेच तेथील परिस्थिती सतत बदलत असल्याने खात्रीशीर भाष्य करणे शक्य नाही, असेही सांगितले.