पुणे : पोलिसाच्या अंगावर दुचाकी घालत मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात दुचाकीसह घुसविण्याचा प्रयत्न करणाºया तरुणाला सहा महिने साधा कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी गजानन नंदनवार यांनी हा आदेश दिला आहे.
शहजाद समीर खान (वय २०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे शिक्षा झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत येरवडा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई ज्ञानेश्वर देशमुख यांनी फिर्याद दिली आहे. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील वामन कोळी यांनी कामकाज पाहिले. त्यांनी सहा साक्षीदार तपासले. पोलीस उपनिरीक्षक आर. एस. शहारे यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार राहुल शिंदे यांनी मदत केली.
संरक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या गाड्यांचा ताफा जाणार असल्याने ९ जानेवारी २०१५ रोजी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी लक्ष्मीनगर, येरवडा ते पर्णकुटी चौकाकडे जाणारी वाहतूक पोलिसांनी थांबविली होती. फिर्यादी पर्णकुटी चौकात कर्तव्यावर होते. त्यावेळी अॅक्टिव्हा गाडीवरून दोन व्यक्ती आल्या. ते काही वेळापुरत्या बंद करण्यात आलेल्या रस्त्याने मुख्य रस्त्याकडे जात होते. त्यावेळी फिर्यादींनी त्यांना अडविले व गाडी बंद करण्यास सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांचा ताफा जात आहे. तो गेल्यानंतर गाडी सोडतो, असे ते म्हणाले. मात्र हा रोजचाच त्रास आहे, मुख्यमंत्र्यांना आम्हीचनिवडून दिले आहे, असे म्हणत गाडीचालक मुख्यमंत्र्याच्या ताफ्यात गाडी घालण्याचा प्रयत्न करू लागला. त्यामुळे फिर्यादींनी गाडीचा हँडल पकडला. त्यामुळे खान याने गाडी रेस करून देशमुख यांच्या अंगावर घातली.या प्रकरणात पोलिसांनी दुचाकी चालक खान याला अटक करून तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. घटनेच्या वेळी आरोपीचे वय आणि तो शिक्षण घेत होता. तर त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला असून, लहान भाऊही शिक्षण घेत आहे.
याबाबींचा विचार करीत लोकसेवकांवर हल्ली होणारे हल्ले लक्षात घेता, आरोपी क्षमेस पात्र नसल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.