पुणे : आयुष्यात एक घटना घडली आणि पुढची साडेसतरा वर्षे त्यांना तुरुंगात घालवावी लागली. परंतु शिक्षणाची ओढ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. शिक्षा झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली आणि पाहता पाहता तुरुंगात राहून चार पदव्या आणि तब्बल आठ पदविका त्यांनी चांगल्या गुणांनी मिळवल्या. ही कहाणी आहे पुण्याच्या खेड तालुक्यातील राणमाळा या गावच्या सतीश शिंदे यांची
साडेसतरा वर्षापूर्वी महाड या ठिकाणी एका बांधकाम व्यवसायिकाकडे कामाला असताना एक खून झाला तेव्हा त्याठिकाणी हजर असल्याने खुनात सहभागी असल्याच्या आराेपावरुन शिंदे यांन साडेसतरा वर्षांची शिक्षा झाली. 17 जून 2005 ला काेर्टाने त्यांना शिक्षा सुनावली. ज्या दिवशी त्यांना शिक्षा सुनावण्यात आली त्याच दिवशी त्यांनी आपण तुरुंगात राहून उच्च शिक्षण घ्यायचा निश्चय मनाशी केला. 20 जून 2005 ला त्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन एफ वाय ला प्रवेश घेतला. आणि पाहता पाहता त्यांनी चार पदव्या आणि 8 पदविका चांगल्या गुणांनी मिळवल्या. यंशवतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबईचे वेलणकर इन्स्टिट्यूट येथून यांनी या पदव्या आणि पदविका मिळवल्या.
ही त्यांची शिक्षणाची ओढ पाहून त्यांना कारागृहाप्रशासनाने देखील मदत केली. कल्याण, अलिबाग, कोल्हापूर आणि येरवडा या कारागृहांमध्ये असताना त्यांनी शिक्षण घेतले. दिवसभर कारागृह जे काम देईल ते शिंदे करायचे आणि रात्री अभ्यास करायचे. त्यांना मार्गदर्शन करण्यास काेणीही नव्हते. पुस्तकांच्या आधारेच अभ्यास करुन त्यांनी यश संपादन केले. कारगृहाप्रशासनाने देखील त्यांच्यातील शिक्षण घेण्याची ओढ पाहून त्यांनी शिक्षणासाठी मदत केली. एक पदवी मिळाली की लगेच शिंदे दुसरी कुठली पदवी घ्यायची याचा विचार करायचे. त्यामुळे त्यांना या परीक्षा देण्यासाठी लागणाऱ्या कारागृहाच्या परवानगीची अडचण आली नाही. या सगळ्या प्रवासात आई, कुटुंब, पाेलीस, कारागृग प्रशासन आणि या काळात साेबत शिक्षा भाेगत असणाऱ्या कैद्यांची मदत मिळल्याचे शिंदे आवर्जुन सांगतात.
सध्या शिंदे हे नवजीवन या बंद्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेत व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत. कारागृहात असताना नवजीवन संस्थेने त्यांना शिक्षणासाठी मदत केली हाेती. लाेकमतशी बाेलताना शिंदे म्हणाले, जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्याच दिवशी उच्च शिक्षण घेण्याचे ठरवले हाेते. आयुष्यात काहीही हाेईल त्याला सामाेरे जाण्याचे ठरवेले हाेते. कारागृहातून बाहेर पडल्यावर आपल्या पायावर उभे राहण्याचा मी निर्धार केला हाेता. नेल्सन मंडेला हे माझ्यासाठी आदर्श हाेते. त्यांनी 26 वर्षे कारागृहात घालविल्यानंतरही ते त्या देशाचे राष्ट्रपती झाले हाेते. तर मी आपल्या पायावर उभा राहुन कुटुंबासाठी काहीतरी नक्कीच करु शकताे. कारागृहातून 14 सप्टेंबर 2018 ला माझी सुटका झाली. त्यानंतर अनेक ठिकाणाहून नाेकरीसाठी मला बाेलविण्यात आले हाेते. परंतु घरच्यांना मी घराजवळ असावे असे वाटत असल्याने ज्यांनी कारागृहात असताना मला मदत केली त्याच संस्थेत काम करण्याचा मी निर्णय घेतला. मला एक माणूस म्हणून जगायचंय.
सतीश शिंदे यांनी कारागृहात राहुन घेतलेल्या पदवी आणि पदवीका
बी. ए (अर्थशास्त्र) , बी. ए (राज्यशास्त्र), एम.ए (अर्थशास्त्र) , एम. ए (राज्यशास्त्र) , डिप्लोमा इन फायनशील मॅनेजमेंट, डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट, डिप्लोमा इन अँग्री बिझनेस मॅनेजमेंट, डिप्लोमा इन बॅंकिंग, डिप्लोमा इन इंडस्ट्रियल मॅनेजमेंट आणि डिप्लोमा इन एंतरप्रेन्यारशिप मॅनेजमेंट