पुणे : खुनाच्या गुन्हयातील न्यायाधीन कैद्याने येरवडा मनोरुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. सुनिल विजयसिंह उर्फ रामपाल प्रजापती (वय 25,मूळ रा. मध्यप्रदेश) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे.
कुर्डुवाडी येथील खूनाच्या गुन्हयातील तो न्यायाधीन कैदी होता. त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून येरवडा मनोरुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास मनोरुग्णालयातील खोली क्र. 9 (बराक क्र. 44)येथील खिडकीच्या गजाला लाल रंगाच्या कपड्याने त्याने गळफास घेतल्याचे कर्मचाऱ्यांनी पाहिले. या गंभीर घटनेची माहिती तात्काळ येरवडा पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, सहाय्यक आयुक्त रामचंद्र देसाई, पोलीस निरीक्षक युनूस शेख, गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे,उपनिरीक्षक अमोल वाघमारे, दिनेश गुजर यांनी भेट दिली.
प्रजापती याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनास्थळी कोणताही पुरावा अथवा चिठ्ठी सापडलेली नाही. खूनाच्या गंभीर गुन्ह्यातील बंद्याने मनोरुग्णालयात केलेल्या आत्महत्येच्या धक्कादायक घटनेमुळे खळबळ निर्माण झाली आहे. अधिक तपास येरवडा पोलिस करीत आहेत.