राहुल गायकवाड पुणे : रागाच्या भरात हातून एखादा गुन्हा घडताे अाणि संपूर्ण अायुष्य उध्वस्त हाेऊन जातं. स्वतःबराेबरच कुटुंबाची फरफट हाेत जाते. अशातच पुन्हा समाजाकडून स्विकारले जाईल की नाही अशी भिती अनेक कैद्यांमध्ये असते. कैदी असले तरी त्यांना सुधारण्याची संधी द्यायला हवी या हेतूने कैद्यांच्या पुनर्वसनाचे काम कारगृह प्रशासनाकडून करण्यात येत असते. येरवडा कारगृहामध्ये 200 पेक्षा अधिक चांगल्या वर्तनुकीचे कैदी हे अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यंना विविध कामात मदत करत असून त्यांच्या कामाचे त्यांना वेतनही देण्यात येते. या उपक्रमाच्या माध्यमातून कैद्यांना एक सुधारण्याची संधी मिळत असून कारागृहप्रशासनावरील ताण कमी हाेण्यास मदत हाेत अाहे.
सध्याच्या घडीला येरवडा कारागृहात साडेपाच हजाराहून अधिक कैदी अाहेत. तर कारागृहाची क्षमता केवळ 2449 इतकी अाहे. राेज या कैद्यांच्या संख्येमध्ये भर पडत असते. यातील काही कैदी हे अनावधानाने हातून घडलेल्या एका चुकीची शिक्षा भाेगत असतात. त्यांचा राग त्यांना येथे घेऊन अालेला असताे. कारागृहात अाल्यानंतर त्यांना अापल्या चुकीचा पश्चाताप झालेला असताे. अशा चांगल्या वर्तनुकीच्या कैद्यांना कारागृह प्रशासनाकडून विविध कामे दिली जातात. हे कैदी कारागृहातील कर्मचाऱ्यांना विविध कामांमध्ये मदत करतात. कैद्यांच्या तुलनेत कारागृह कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने हे कैदी त्यांचे मदतनीस हाेतात. इतर कैद्यांवर नजर ठेवणे, स्वयंपाक घरातील विविध कामं करणे, रात्री अाळीपाळीने जागरण करुन इतर कैद्यांवर लक्ष ठेवणे, कैद्यांना मुलाखतीला घेऊन जाणे तसेच एखाद्या कैद्याला हाॅस्पिटल मध्ये घेऊन जाणाऱ्या अधिकाऱ्याला मदत करणे अशी विविध कामे ते करत असतात. त्यांना या कामाचे वेतनही प्रशासनाकडून दिले जाते.
याबाबत बाेलताना कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार म्हणाले, चांगल्या वर्तनुकीचे दाेनशेहून अधिक कैदी हे कारागृहातील कर्मचाऱ्यांना विविध कामांमध्ये मदत करतात. त्यामुळे कारागृहाचे नियाेजन संभाळण्यासही मदत हाेते. तसेच या कैद्यांच्या पुनर्वसनात याचा माेठा फायदा हाेताे. त्यांच्या कामाचे त्यांना वेतनही दिले जाते. त्याचबराेबर अाम्ही ठराविक कालावधीनंतर कैद्यांची पंचायत सुद्धा घेत असताे. त्यात कारागृहातील विविध विषयांवर चर्चा केली जाते.