पुणे : कारागृहाच्या बाहेरच्या जगात अनेक मोठे गुन्हेगार कायद्यातील पळवाटांचा आधार घेऊन उजळ माथ्याने फिरत असताना, तुम्ही सर्वांनी आपलं वेगळेपण समाजाला दाखवले आहे. तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महाराष्ट्र कारागृह प्रशासन, भोई प्रतिष्ठान व आदर्श मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेला ‘प्रेरणापथ’ देशभरातील कारागृहांसाठी आदर्शवत ठरणारे आहे. त्यामुळे कारागृहे ही खऱ्या अर्थाने सुधारगृहे ठरतील असे सुप्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांनी येथे सांगितले.बंदिजनांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली दोन वर्षे सुरू असलेल्या ‘प्रेरणापथ’ या प्रकल्पांतर्गत विक्रम गोखले यांनी शनिवारी येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे बंदिजनांशी स्नेहसंवाद साधला. याप्रसंगी, विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह विभाग) डॉ. विठ्ठल जाधव, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह अधीक्षक यू. टी. पवार, कार्यक्रमाचे संयोजक व प्रेरणापथ प्रकल्पाचे समन्वयक डॉ. मिलिंद भोई, उदय जगताप उपस्थित होते.कारागृह अधीक्षक यु. टी. पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सागर पवार, कारागृह सल्लागार समितीचे सदस्य सागर माळकर, मनोज देशपांडे, अजय मारणे, डॉ. प्रमोद सातपुते, कारागृह उपअधीक्षक चंद्रमणी इंदूरकर, वरिष्ठ तुरुंगाधिकारी नितीन क्षीरसागर, अतिरिक्त तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर खरात, जी. ए. मानकर,संजय मयेकर व कारागृह शिक्षणाधिकारी नामदेव शिंदे यांनी परिश्रम घेतले.विशेष पो. महानिरीक्षक डॉ. विठ्ठल जाधव यांनी याप्रसंगी बोलताना बंदिजनांसाठी सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती देऊन याची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले. कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांनी विक्रम गोखले यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करुन या ठिकाणी गोखले यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करुन या ठिकाणी वारंवार स्नेहसंवादासाठी येण्याचे आवाहन केले.‘प्रेरणापथ’ चे समन्वयक डॉ. मिलिंद भोई यांनी बंदिजनांसाठी लवकरच ‘ई-लायब्ररी’ सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
‘प्रेरणापथ’मुळे कारागृहे होतील सुधारगृहे - विक्रम गोखले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 1:52 AM