पुणे : ईडी, सीबीआयच्या धाडी टाकून मोदी सरकारने मोठ्या कंपन्या व व्यक्तींना भीती दाखवत निवडणूक रोख्यांच्या नावाखाली पैसा गोळा केला. त्यांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून जगातील सर्वांत मोठा घोटाळा केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला. देशात इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही निवडणूक रोखे प्रकरणाचा तपास करू, असेही त्यांनी सांगितले.
पुणे लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ चव्हाण काँग्रेस भवन येथे आले होते. यावेळी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे, मोहन जोशी, रमेश बागवे, दीप्ती चवधरी, ॲड. अभय छाजेड, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, गोपाल तिवारी आदी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, शेतकऱ्यांच्या जीवनात नरेंद्र मोदी सरकारने विष कालवलं आहे. निर्यातबंदीमुळे शेतपिकाचे भाव पडले. शेती कायदे मागे घ्यावे लागले. त्यामुळे मोदी सरकारचा अपमान झाला आहे. त्यामुळे सूड उगवला जात आहे. नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिलेली आश्वासने का पूर्ण करू शकले नाहीत, याचा अहवाल द्यावा. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी मोदींचा पराभव होणे गरजेचे आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.
महाविकास आघाडीतील जागावाटप ४८ पैकी ४६ ठिकाणी एकमताने झाले. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी, तेथे विशाल पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी आम्ही शेवटपर्यंत आग्रही होतो. ती जागा आमची हक्काची आहे, मात्र आता निवडणूक सुरू झाल्याने सर्वांनी एकत्र येऊन लढणे गरजेचे आहे. विशाल पाटील माघार घेतील आणि सांगलीतही गोड शेवट होईल, असेही चव्हाण म्हणाले.
‘गद्दार भगाओ, काँग्रेस बचाओ’
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यासमोरच शहर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे. काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस भवनमध्ये बॅनर्सबाजी करण्यात आली. भाजपच्या नेत्यांची नागपूरमध्ये भेट घेऊन येणाऱ्यांचा जाहीर निषेध असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आला आहे. ‘गद्दार भगाओ, काँग्रेस बचाओ’ असा उल्लेख बॅनर्सवर करण्यात आला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माजी उपमहापौर आबा बागुल यांनी भाजपचे नेते, उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात जाऊन भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर ही बॅनरबाजी करण्यात आली आहे.