पुणे : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे नाव शिखर बँक घोटाळ्यात गोवल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. तसेत सरकारने ईडीला सूडबुद्धीने गुन्हा नोंदवायला लावल्याचा आरोप खुद्द पवारांनी केला होता. यावर मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या नेत्यांनी प्रतिक्रिया नोंदविल्या होत्या. पोलिसांच्या सूचनेवरून पवार यांनी ईडीच्या कार्यालयात न जाण्याचा निर्ण जाहीर केला आणि आज या राजकीय नाट्याचा समारोप झाला. मात्र, पुण्याची पूरस्थिती पाहण्यासाठी गेलेल्या चंद्रकांत पाटलांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. यावेळी त्यांनी शिखर बँकेच्या चौकशीसह सिंचन घोटाळ्यावरून जलसंपदा खात्याची श्वेतपत्रिका काढली होती. यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीत कुरघोड्या सुरू असल्याचे वातावरण होते. मात्र, नंतर भाजपाचे सरकार आले आणि नंतरची पाच वर्षे सरकारने यावर एकही शब्द उच्चारला नाही. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांचे नाव ईडीच्या गुन्ह्यामध्ये आल्याने पुन्हा एकदा वातावरण तापले आहे.
पुण्यातील पूरग्रस्तांनी विरोध केल्यानंतर काढता पाय घ्यावे लागलेले चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावरील ईडी प्रकरणावर भाष्य केले. या देशात ईडी, सीबीआय, कोर्ट यात सरकार लक्ष घालू शकत नाही. यामुळे यात भाजप सरकारचा कोणताही संबंध नसल्याचे ते म्हणाले. लोक आता हुशार झालेत. आकसाने केले म्हणून म्हणून इव्हेंट करतात. छगन भुजबळ यांना अटक झाल्यावर का नाही केले असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
शिखर बँकेचे राजकारण काँग्रेसने केले. सगळ्या विषयांचा संबंध सरकारशी जोडणे चुकीचे आहे. कदाचित पृथ्वीराज चव्हाणांनी आकसापोटी कारवाई केली असेल, मला माहिती नाही असे म्हणत या प्रकरणामागे काँग्रेसचा हात असल्याचा टोला त्यांनी लगावला. २०१० साली काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार असताना राज्य सहकारी बँकेवर शरद पवार यांना मानणार सरकार होत. त्यांच्या सल्ल्याने चालत होत. त्यावेळी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे, कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झाल्याचे ते म्हणाले.
विरोध कशासाठी ?परवा रात्री पुण्यामध्ये ढगफुटी झाली. यामध्ये हजारो गाड्या पाण्यात गेल्या तर जवळपास 12 जण वाहून गेले. मात्र, सरकारी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही. यामुळे आता काय फोटो काढायला आलात का, असा संतप्त सवाल पुणेकरांनी केला. यामुळे या रोषापुढे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अक्षरश: मानवी साखळी करत चंद्रकांत पाटलांना बाहेर काढले.