लासुर्णे (पुणे) : छत्रपती कारखाना निवडणुकीच्या अनुषंगाने कारखाना कार्यक्षेत्रातील वातावरण ढवळून निघाले आहे. लासुर्णे येथे राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी गुरुवारी (दि.25) विचारविनिमय बैठक बोलावली होती. मात्र विविध मतमतांतरानंतरही पृथ्वीराज जाचक यांची भूमिका गुलदस्त्यात राहिली आहे. तर पृथ्वीराज जाचक काय भूमिका घेतात याची चर्चा संपूर्ण कारखाना कार्यक्षेत्रात सध्या सुरू आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी दीड वर्षापूर्वी चर्चा केल्यानंतर छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचकांनी पवार कुटुंबीयांशी जुळवून घेतले होते. त्यानंतर जाचक यांनी श्री छत्रपती कारखान्याच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली. परंतु ८ ऑक्टोबर रोजी जाचक यांना कारखान्याच्या बैठकीत बसण्यास काही संचालकांनी विरोध केला. या घटनेनंतर जाचक यांनी कारखान्यामध्ये लक्ष घालण्याचे बंद केले. परंतु छत्रपती कारखान्याच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काय भूमिका घ्यायाची यासाठी विचारविनीमय करण्यासाठी लासुर्णे येथे सर्व सभासद व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले होतेे.
यामध्ये कारखाना कार्यक्षेत्रातील शिवाजी निंबाळकर, विशाल निंबाळकर, ऍड. हेमंत नारुटे, अनिल खैरे, युवराज मस्के, रामचंद्र निंबाळकर, दिलीप शिंदे, प्रदीप थोरात, संभाजी काटे, तुकाराम काळे, विशाल जाधव, जयराम रायते व रवींद्र टकले आदी सभासदांनी आपली मते मांडली. शेवटी जाचक यांनी आपण मांडलेल्या मतांचा विचार करून आपण निर्णय घेऊ असे सांगितल्याने जाचक यांची आगामी छत्रपतीच्या निवडणुकीत काय भूमिका राहणार हे गुलदस्त्यातच राहिले आहे. यावेळी शहाजी शिंदे, वसंत मोहळकर,संग्राम निंबाळकर,सतीश काटे आदी सभासद उपस्थित होते.
सर्व सभासदांच्या आग्रस्तव मी पवार कुटुंबीयासोबत जुळवून घेतले. कारखान्याच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली. परंतु सभासदांच्य हिताचा निर्णय घेताना संचलक मंडळ आडकाठी आणते. छत्रपती कारखाना सव्वा लाख सभासदांचा प्रपंच आहे. २०१८-१९ ला चार लाख टन गाळप झाले. मागील गाळप हंगाम सव्वा नऊ लाख टन झाले. हे सर्व करत असताना कोजण चे तीन टर्बैन आहेत. त्यावर लक्ष दिले तर जास्त प्रमाणात वीज तयार होईल परंतु पाणी कमी पडत असल्याचे कारण सांगत आहेत. कारखान्याचे ऑडिट करायला तयार नाहीत. साखरेच्या पोत्याचा हिशोब जुळत नाही. संचालकांचे ऊस वाहतुकीची वाहने विना नंबर खाली होतात. पाच लाख पोती साखर विकायला काढली तेंव्हा सांगितले होते की दर वाढणार आहेत तेंव्हा देखील कोणी एकायला तयार नाही. यामुळेे प्रती किलो १.५० प्रमाणे पाच लाख पोत्याचे १५० कोटी तोटा झाला. नऊ ते दहा हजार सभासद बिगर ऊस उत्पादक आहेत. त्यांना आपण प्रती महिना पाच किलो साखर देतो यामुळे देखील आपला कोट्यावधी रुपये तोटा होत आहे. ३५१२ सभासद मयत असूनही त्यांची नावे आजही कमी करण्यात आलेली नाहीत. २१ संचालकापैकी अपवाद १ या २ संचालक वगळता बाकीचे नवसाने सुध्दा मिळणार नाहीत. १३ ते १४ लाख टन गाळप न झाल्यास पुढील तीन ते चार वर्षात कारखाना टिकणार नाही. आपल्या सर्वांच्या सहकार्याने कारखाना ताब्यात आल्यावर पाच वर्षात छत्रपती पुन्हा नंबर एक करू असे आश्वासन जाचक यानी सर्व सभासदांना यावेळी दिले.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेससह पॅनल उभा करावा किंवा स्वतंत्र पॅनल उभा करून निवडणूक लढवावी याबाबत संमिश्र मतमतांतरे व्यक्त झाली. काही वक्त्यांनी राष्ट्रवादीसह पॅनल उभा करून कारखान्याच्या हितासाठी एकत्र यावे, अशी भूमिका मांडली. तर काहींनी माळेगाव मध्ये राष्ट्रवादीची सध्या सत्ता आहे. जो माळेगाव कारखाना विरोधकांकडे असताना ज्यादा दर देत होता. मात्र सध्या या कारखान्याची अवस्था काय आहे हे आपण पाहत आहोत. त्यामुळे पृथ्वीराज जाचक यांनी स्वतंत्र पॅनल करून निवडणूक लढवावी अशी भूमिका मांडली.
तर काही सभासदांनी कारखान्याचे संचालक कोणी असूद्यात मात्र चेअरमन म्हणून पृथ्वीराज जाचक हवेत. त्यासाठी वाटेल ती तडजोड करू. मात्र छत्रपती कारखान्याची सध्याची बिकट अवस्था ज्या संचालक मंडळाने केली. त्या संचालक मंडळाला पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी देऊ नये, भूमिका घ्यायला हवी, असे मत व्यक्त केले. विविध मतमतांतरे ऐकल्यानंतर पृथ्वीराज जाचक यांनी या सर्वांच्या मताचा मी पूर्ण आदर करतो. सर्वसमावेशक निर्णय लवकरच घेऊ. परंतु छत्रपती कारखाना नक्की वाचवू, अशी ग्वाही दिली