पुणे : झपाट्याने वाढत असलेल्या वाहन संख्येमुळे शहरातील पार्किंगचा प्रश्नही गंभीर बनला आहे. शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहनांचे पार्किंग फुल्ल असते. परिणामी नो पार्किंग भागात वाहने लावण्याचे प्रमाणही अधिक आहे. वाहनांचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शहरातील खासगी रहिवासी इमारतींमध्ये ''पे अँड पार्क ''चा पर्याय पुढे आला आहे. शहरातील अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये दुपारच्या वेळी पार्किंगसाठी मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध होऊ शकते. याठिकाणी पार्किंगला मान्यता मिळाल्यास पार्किंगचा प्रश्न बऱ्याच अंशी सुटू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. महापालिकेकडून पार्किंग धोरण तयार करून सर्व रस्त्यांसह सार्वजनिक ठिकाणी पे अँड पार्कचा निर्णय घेतला आहे. मात्र, अद्याप या धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. या धोरणामध्ये केवळ सार्वजनिक ठिकाणच्या पार्किंगचा समावेश आहे. त्यातच आता महापालिकेने मॉल्समध्ये मोफत पार्किंगचा निर्णय जाहीर केला आहे. हा निर्णय धोरणविरोधी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पार्किंग धोरणालाही अनेकांनी विरोध केल्याने त्याची अंमलबजावणी लवकर होणे सध्यातरी शक्य दिसत नाही. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत जाणार आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी खासगी इमारतींमध्ये पार्किंगला मान्यता देण्याबाबत काहींनी आग्रही भुमिका घेतली आहे.शहरामध्ये अनेक रुग्णालये, महाविद्यालये, मोठी दुकाने, कार्यालये, अनेक रहिवासी सोसायट्यांमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे त्यामुळे तिथे येणारी वाहने रस्त्यावर उभी केली जातात. तिथेही जागा अपुरी पडत असल्याने पार्किंगचा प्रश्न निर्माण होतो. तर दुसरीकडे शहरात अनेक मोठ्या रहिवासी इमारती आहेत. त्यामुळे मुबलक पार्किंग व्यवस्थाही उपलब्ध असते. दिवसभर या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची वाहने बाहेर नेली जातात. त्यामुळे पार्किंगसाठी सहज जागा उपलब्ध होऊ शकते. अन्य भागातून या परिसरात येणाऱ्यांची वाहने काही कालावधीसाठी इमारतींमध्ये उभी केली जाऊ शकतात. या सोसायट्यांमध्ये पे पार्क अँड चा पर्याय पुढे केल्यास पार्किंग प्रश्न बऱ्याच अंशी सुटू शकेल तसेच सोसायट्यांनाही आर्थिक फायदा होईल. महापालिकेकडून त्यासाठी नियमावली तयार करावी लागेल. काही देशांमध्ये ही कल्पना राबविली जात आहे, असे वाहतुक तज्ज्ञ प्रांजली देशपांडे यांनी सांगितले...............खासगी इमारतींमध्ये पार्किंग करण्याबाबतचा समावेश पार्किंग धोरणामध्ये नाही. जिथे पार्किंगचा प्रश्न आहे, अशा मोठ्या शहरांमध्ये ही कल्पना राबविली जाते. मुंबईत नरिमन पॉईंट भागात सोसायट्यांमध्ये पार्किंग होते. पण पुण्याच्या विकास नियंत्रण नियमावली (डीसी रुल)मध्ये खासगी इमारतींमध्ये पे अँड पार्किंग चा नियम नाही. त्यामुळे महापालिकेकडून त्याला मान्यता दिली जाणार नाही. याबाबतचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागेल. डी. सी.रूलमध्ये तसा बदल करावा लागेल.- श्रीनिवास बोनाला, प्रकल्प अधिकारी, पुणे महापालिका..
.........
ही कल्पना राबवावीडेक्कन जिमखाना भागातील गुप्ते हॉस्पीटलला पार्किंगच्या समस्येला तोंड द्यावे लागते. रुग्णालयाकडून रुग्ण, डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी पार्किंगची व्यवस्था केली आहे. पण अनेकदा ती अपुरी पडते. त्यामुळे लगतच्या रस्त्यांवर पार्किंग करावी लागते. रुग्णालय फर्ग्युसन रस्त्यालगत असल्याने तिथे येणाऱ्यांची वाहने अंतर्गत रस्त्यांवर उभी केली जातात. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्यांना पार्किंगची समस्या भेडसावते. रुग्णालय परिसरामध्ये एका इमारतीचे मैदान आहे. एका बँकेचीही पुरेशी जागा आहे. तिथे ठराविक दिवशी किंवा ठराविक वेळेत पार्किंगसाठी जागा मिळू शकते. अनेकांना पार्किंगचा प्रश्न भेडसावतो. त्यादृष्टीने ही कल्पना चांगली आहे. त्यासाठी रुग्णालयही तयार असून त्याला मान्यता मिळायला हवी. अनेकजण यामध्ये सहभागी होतील. स्वतंत्र अँप बनविल्यास त्यावर उपलब्ध जागांची माहितीही मिळू शकेल, असे रुग्णालयाचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर नितीन गुप्ते यांनी सांगितले.