बाभुळगाव (ता.इंदापूर) : वरकुटे (ता.इंदापूर) हद्दीत बस चालकाला डुलकी लागल्याने खासगी बसचा अपघात होऊन बसच्या क्लिनरचा जागीच मृत्यू असून २८ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यामधील दोन गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी पुणे येथील ससुन हाॅस्पिटलमध्ये दाखल केले आहे. सदरचा अपघात पुणे सोलापूर महामार्गावर वरकुटे पाटी- लोंढे वस्तीनजिक शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला. बापुराव पंडु सुर्यवंशी(वय ३५ रा.धनेगाव) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर २८ प्रवासी जखमी झाले आहेत. याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्लीपर कोच खासगी बस मुंबई वरून अक्कलकोटकडे निघाली होती. इंदापूरजवळ बस चालकाला डोळा लागल्याने बस पहिल्या लेन वरून दुसऱ्या लेन वर जावून रस्त्याच्या दुभाजकाला धडकली. त्यानंतर पहिल्या लेनवर बस पलटी झाली. यात क्लिनरचा जागीच मृत्यू झाला असून तर इतर प्रवाशी जखमी झाले. जखमींना उपजिल्हा रुग्णालय इंदापूर,सोलापूर याठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती समजताच इंदापूर महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक शंकर मुटेकर, पोलीस हवालदार संतोष काळे, वसंत कदम,पोलिस कॉन्सटेबल तानाजी लोंढे यांच्यासह इंदापूर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य केले.