पुणे: राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून दोन हजार खाजगी बसेस राज्यातील विविध स्टँडवरून गाड्या सोडण्यात आल्या होत्या. परंतु एसटी प्रशासन अधिकारी, स्थानिक पोलिस अधिकारी यांच्याकडून सहकार्य न मिळाल्यामुळे बसेस विना प्रवासी परत आल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे आज सकाळपासून खाजगी बस एसटीच्या आवारातून सोडणे बंद केले होते. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आता खाजगी बस पुन्हा एसटी स्टँडच्या आवारातून सुटणार असल्याची माहिती खाजगी बस संघटनेचे कार्याध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, बुधवारी आठ ते दहा ठिकाणी खासगी बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्याचबरोबर अनेक ठिकाणी चालकांना मारहाण करण्यात आली. याबाबत आज सकाळी दहा वाजल्यापासून पुणे व राज्यातील इतर ठिकाणी खाजगी बस एसटीचा आवारातून न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत सर्व संघटनांचे प्रतिनिधी व अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यामध्ये पोलीस महासंचालक, माननीय परिवहन आयुक्त, एसटीचे संचालक होते. खाजगी बसेसला सुरक्षा व चालकांना सुरक्षा देण्याची हमी मिळाल्यानंतर खाजगी बस सुरू करण्याच निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिंदेंनी दिली.