पुणे : संपूर्ण राज्यभरात पूजा चव्हाणचा मृत्यू गाजत आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करावी, अशी मागणी करणारा एक खासगी खटला येथील लष्कर न्यायालयात शुक्रवारी (दि.२६) दाखल झाला. या खटल्यावर पाच मार्च रोजी निकाल होणार आहे.
लीगल जस्टिस सोसायटीतर्फे अॅड. भक्ती पांढरे यांनी खटला दाखल करून घेण्यासाठी लष्कर न्यायालयात अर्ज केला होता. त्यावर झालेल्या युक्तिवादानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी पाटील यांच्या न्यायालयात हा खटला दाखल झाला आहे.
वानवडी परिसरामध्ये पूजा चव्हाणचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्याची मागणी सातत्याने होत असतानाही पंधरा दिवस उलटले तरी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील सत्यता बाहेर येण्यासाठी आम्ही हा खटला दाखल केला असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी सांगितले.
या प्रकरणाशी महाआघाडीमधील एका मंत्र्यांचे नाव जोडले जात आहे. काही व्हिडीओ क्लिपही बाहेर आल्या आहेत. मात्र न्यायालयात खटला दाखल करताना कुणाचेही नाव न घेता अज्ञात व्यक्तीविरुद्ध हा खटला दाखल करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
चौकट
“पूजा चव्हाण मृत्यूनंतर पोलिसांना वारंवार तक्रार अर्ज देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. विविध सामाजिक संघटना, पक्ष सर्वांमध्येच या घटनेबाबत संभ्रम आहे. रजिस्टर गायब होणे किंवा व्हिडीओ क्लिप्स व्हायरल होणे याबाबत पोलीस कोणतीच कारवाई करताना दिसत नाही. आमच्याही अर्जावर पोलिसांनी कोणतीच कारवाई न केल्यामुळे आम्ही स्वत:हून कोर्टात धाव घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना आदेश होणे गरजेचे असल्याचे म्हणणे मांडले. या प्रकरणात अनेक बड्या लोकांची नावे समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनाने तपास कामात जाणीवपूर्वक दिरंगाई केल्याचे दिसून येते.”
- अॅड. विजयसिंह ठोंबरे, अध्यक्ष लीगल जस्टिस सोसायटी
चौकट
खून की आत्महत्येस प्रवृत्त?
पूजा यांना कोणी आत्महत्येस प्रवृत्त केले असेल तर त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०६ नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. पूजा यांना इमारतीवरून कुणी ढकलून दिले असेल तर आरोपींवर ३०२ कलम म्हणजे खूनाचा गुन्हा दाखल होऊ शकतो.
-----------------------------------------------------