पुणे : कोरोनाबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभुमीवर खासगी डॉक्टरांनी पुढाकार घेत या लढ्यात सक्रीयपणे सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने पुढाकार घेतला असून कम्युनिटी, रक्षक आणि मोबाईल क्निनिकच्या माध्यमातून रुग्ण तपासणी केली जाणार आहे. आरोग्य विभागाच्या सहकार्याने संपुर्ण राज्यात ही क्लिनिक सुरू केली जाणार आहेत.
‘आयएमए’कडून कोरोनाविषयक विविध उपाययोजना करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये आयएमए महाराष्ट्रचे अध्यक्ष अविनाश भोंडवे, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे, डॉ. अशोक आढाव, डॉ. रवि वानखेडकर, डॉ. अशोक तांबे, डॉ. जयेश लेले, डॉ. मंगेश पाटे यांचा समावेश आहे. या टास्क फोर्सकडून आयएमए कम्युनिटी क्लिनिक, रक्षक क्लिनिक आणि मोबाईल क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही भागात कम्युनिटी क्लिनिक सुरू केली जाणार आहेत.
आरोग्य विभाग व आयएमएच्या सहकार्याने शहरी भागात कम्युनिटी क्लिनिक्स सुरू करण्याचे नियोजन आहे. पालिका प्रशासन किंवा राज्य शासनाकडून जागा व आवश्यक सुविधा दिल्यास दिले आयएमएचे सदस्य डॉक्टर्स सेवा देतील. तिथे रुग्णवाहिकेसह रुग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य उपलब्ध असेल. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास आदी लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी या क्लिनिकवर केली जाईल. खासगी किंवा शासकीय रुग्णालयांमध्ये येणारे या लक्षणांचे रुग्ण या क्लिनिकमध्ये पाठविले जातील. रक्षक क्लिनिकमध्ये केवळ कोविड १९ आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची तपासणी होईल. खासगी क्लिनिक किंवा रुग्णालयांनाच विशेष कोविड १९ रक्षक क्लिनिक म्हणून मान्यता मिळेल. तिथे नियमित सल्ल्यासह ईसीजी, एक्स रे, छोटी प्रयोगशाळा, औषधे आदी सुविधा असतील. ग्रामीण भागात अशी क्लिनिक सुरू करण्याचे नियोजन आहे.
शहरांमध्ये वार्ड किंवा प्रभागनिहाय रुग्णवाहिकेमध्ये रुग्ण तपासणीची सुविधा मिळावी यासाठी मोबाईल क्लिनिकची संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यामध्ये एक डॉक्टर व परिचारिका असेल. आवश्यक औषधे व वैद्यकीय साहित्य उपलब्ध केले जाईल. ही रुग्णावाहिका प्रत्येक भागात तीन ठिकाणी किमान तीन तास थांबेल. रुग्णांवर प्राथमिक उपचार करून आवश्यकतेनुसार पुढील तपासणीचा सल्ला दिला जाईल, अशी माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे व सचिव डॉ. पंकज बंदरकर यांनी दिली.