शेलपिंपळगाव : मरकळ (ता. खेड) येथील खासगी कंपनीत काम करणाऱ्या ३२ कामगारांना कोरोनाची लागण झाली. मात्र, कामगारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती संबंधित कामगार ठेकेदाराने लपवून ठेवत संबंधित सर्व रुग्णांना कंपनीच्या पत्राशेडच्या गोदामातच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार खेड पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने उघडकीस आणला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने संबंधित कंपनीला नोटीस बजावून त्या ३२ कामगारांना उपचारासाठी महाळुंगे कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे. प्रशासनाने योग्य वेळी दाखल घेतली म्हणून भविष्यातला कोरोना पसरण्याचा आणि कामगारांच्या आरोग्याचा धोका टळला आहे.
मरकळ ग्रामपंचायत हद्दीत अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची गंभीर बाब लक्षात घेऊन स्थानिक ग्रामपंचायत, पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, सभापती भगवान पोखरकर, माजी सभापती अंकुश राक्षे, पंचायत समिती सदस्य अरुण चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी आढावा घेतला. दरम्यान, कोरोनाबाधित ३२ कामगार कंपनीच्या गोदाममध्ये वास्तव्य करत असल्याचे उघडकीस आले आहे.