पुणे : बरेच प्रयत्न करूनही डेंगीची साथ आटोक्यात येत नसल्याने महापालिकेने आता खासगी रुग्णालयांमधील डॉक्टरांची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात भारती हॉस्पिटलमधील ६ तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावण्यात आले आहे. ते पालिकेच्या रुग्णालयांमधून सेवा देतील. तसेच घरोघरी जाऊन तपासणी करण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने तब्बल १ हजार ३०० जणांची नियुक्ती केली आहे.पाऊस, ओलसर हवामान, उन्हाचा अभाव यामुळे शहरातील वातावरण सध्या खराब झाले आहे. जिवाणूंना पोषक अशा या वातावरणात शहरामध्ये साथीच्या आजारांचा फैलाव झाला आहे. त्यातही डेंगी व चिकुनगुनिया या आजारांच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महापालिकेच्या सेवेत असलेल्या काही डॉक्टरांनाही या आजाराने ग्रासले आहे. या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांची मदत घेण्याची सूचना महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला केली होती. पालिकेच्या सेवेत सध्या १८० डॉक्टर आहेत. त्यातील काही स्वत:च आजारी असल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याने यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमधील डॉक्टरांची मदत घेण्यात येत आहे. पालिकेच्या रुग्णालयांमधून हे डॉक्टर सेवा देतील. रुग्णांना तपासणे, त्यांना औषध सांगणे याप्रकारची जबाबदारी ते घेणार आहेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
पालिकेच्या मदतीला खासगी डॉक्टर
By admin | Published: October 04, 2016 1:51 AM