पुणे - केंद्र सरकारने संचारबंदी लागू केली असली तरी सरकारी तसेच खाजगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण (ओ पी डी) आणि आंतररुग्ण विभाग नेहमीप्रमाणे खुले ठेवावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. तसेच आरोग्य विभागाने विविध सूचनाही दिल्या आहेत.
संचारबंदी लागू झाल्यानंतर अनेक डॉक्टरानी आली क्लिनिक बंद ठेवली आहेत. तर काही मोठ्या हॉस्पिटल मध्ये गर्दी टाळण्यासाठी ओपीडी ची संख्या कमी केली जात आहे. लोकही घाबरून घराबाहेर पडत नाही. मात्र अनेक रुग्णांना वरचेवर रुग्णालयात जाऊन तपासणी करावी लागते. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने खासगी व शासकीय रुग्णालयांना ओपीडी बंद न ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच रुग्णालय स्तरावर फ्ल्यू सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी वेगळी ओपीडी करण्यास सांगितले आहे.
परदेशी प्रवासाचा इतिहास अथवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात न आलेल्या व सर्दी, खोकला असलेल्या रुग्णास विनाकारण कोरोना चाचणीचा आग्रह धरु नये. संचारबंदीच्या काळात कामानिमित्त घराबाहेर पडणा-या सामान्य नागरिकांना काही ठिकाणी पोलिस मास्क घालण्याबाबत सक्ती करत असल्याबाबत काही तक्रारी कॉलसेंटरला प्राप्त झाल्या आहेत. परदेशातून आलेले लोक, कोरोना बाधित रुग्ण, करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात असणा-या व्यक्ती आणि मेडिकल स्टाफ या शिवाय इतर सामान्य नागरिकांनी मास्क वापरण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे मास्क घालण्याबाबत अशी सक्ती कोणीही करु नये, असे आवाहनही आरोग्य विभागाने केले आहे.