.................................
खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी गुरूवारी महापालिकेकडून लसच उपलब्ध झाली नाही. त्यामुळे, कोथरूडसारख्या मोठ्या उपनगरात खासगी रूग्णालयांमध्ये गुरुवारी लसीकरण होऊ शकले नाही. त्याचा नागरिकांना विशेषत: ज्येष्ठांना मोठा फटका बसला. अनेकांना रुग्णालयांत येऊन लस न घेताच माघारी परतावे लागले. त्यांच्याकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत होता. अन्य राज्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात महाराष्ट्रातील नागरिकांसाठी कमी संख्येने लस उपलब्ध होत असल्याचे वृत्त दुपारनंतर धडकताच नागरिकांच्या संतापात भर पडली. या परिस्थितीत, केंद्र सरकारने भेदाभेद करणे मानवतेला काळिमा फासणारे आहे, अशा शब्दांत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, सोमवारपर्यंत महापालिकेकडून लस मिळण्याची शक्यता नसल्याने कोथरूडसह अन्य उपनगरातील खासगी रूग्णालयांनी सोमवारपर्यंत ऑनलाईन लसनोंदणी बंद केली आहे. शनिवार, रविवार सुटीचा योग साधून ज्यांनी लसीकरणाबाबत नियोजन केले होते त्यांचा यामुळे हिरेमोड झाला.
याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना एक खासगी रूग्णालय संचालक म्हणाले, एकीकडे लसीकरणासाठी नव्याने ४०-४२ खासगी रूग्णालयांना परवानगी देता आणि दुसरीकडे लसच उपलब्ध नसते, यापेक्षा वाईट नियोजन काय असू शकते, असाही सवाल त्यांनी केला.