पुणे शहरासह जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलचे 80 टक्के बेड ताब्यात घेणार; पालकमंत्र्यांचे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 10:12 PM2020-05-22T22:12:01+5:302020-05-22T22:25:27+5:30

लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने अधिकाऱ्यांनी काम करावे. 

Private hospitals 80 percent beds will be taken over in pune district with city: Ajit Pawar orders | पुणे शहरासह जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलचे 80 टक्के बेड ताब्यात घेणार; पालकमंत्र्यांचे आदेश 

पुणे शहरासह जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलचे 80 टक्के बेड ताब्यात घेणार; पालकमंत्र्यांचे आदेश 

googlenewsNext
ठळक मुद्देअजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची बैठककेंद्राकडून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करावेत ग्रामीण रुग्णालये अधिक सक्षम करण्याची गरज नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता

पुणे : पुणे शहरासह जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यातील परिस्थितीचा विचार करून शहर, जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटल मधील तब्बल 80 टक्के बेड ताब्यात घेण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेले नियोजन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत दिले. दरम्यान कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी सर्वच आघाड्यांवर प्रयत्न केले जात असले, तरी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन व त्यांच्या सहकार्याने काम करावे, अशा सूचना देखील त्यांनी दिल्या. 
पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, तथापि, खासदार वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, गिरीश बापट यांनी केंद्राकडून अधिकाधिक निधी आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, सोशल मिडिया अधिक सक्रिय केला पाहिजे. कोरोनाच्याबाबत केल्या जाणाऱ्या उपाययोजना व प्रशासनाच्यावतीने सामान्य नागरिकांसाठी देण्यात येणाऱ्या सूचनांची रोजच्या रोज माहिती दिली जावी. जेणेकरुन लोकप्रतिनिधींना माहिती मिळेल. खासदार सुप्रिया सुळे यांनी परराज्यात रेल्वेने लोकांना पाठविले, प्रशासनाने याबाबत उत्तम काम केले असल्याचे सांगितले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी वेळोवेळी प्रशासनाने लोकप्रतिनिधींना अद्ययावत माहिती द्यावी,अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रामीण रुग्णालये अधिक सक्षम करण्याची गरज असल्याचे सांगितले. खासदार गिरीश बापट म्हणाले, परराज्यातील मजूर त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी अधिकाधिक रेल्वेची व्यवस्था करण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींना माहिती वेळोवेळी देण्यात यावी. पोलिस प्रशासनानेही समन्वय ठेवावा.पुणे कँटोन्मेंटला आणखी निधी द्यावा, असे ते म्हणाले.
आमदार शरद रणपिसे यांनी कोरोनाबरोबर राहण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. प्रभागनिहाय समिती नेमा. त्यात स्थानिक लोकप्रतिनिधींना सामावून घ्या. नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. पावासाळ्यापूर्वीची कामे त्वरित करून घ्या, असेही त्यांनी सांगितले. आमदार सिध्दार्थ शिरोळे, लक्ष्मण जगताप, भीमराव तापकीर, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, सुनील शेळके, महेश लांडगे, आण्णा बनसोडे आदींनी चर्चेत भाग घेऊन उपयुक्त सूचना केल्या.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी सांगितले, कोरोना विषाणूला नियंत्रणात आणण्यासाठी विविध आघाड्यांवर प्रयत्न करण्यात येत आहे. सनदी अधिकाऱ्यांवरही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.योग्य तो निधी जिल्ह्याला उपलब्ध करून दिला आहे.सर्व यंत्रणा समन्वयाने काम करीत आहे, असे सांगितले. जमाबंदी आयुक्त एस.चोकलिंगम यांनी ससून हॉस्पिटलबाबत माहिती देताना सांगितले, मृत्यू दर आता कमी झाला आहे. ससूनची क्षमता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, मृत्यू दर कमी होत आहे.२१८२ लोक बरे होऊन घरी गेले आहेत. १० कोटीपेक्षा अधिक निधी विविध संस्थांनी वैद्यकीय उपकरणासाठी उपलब्ध करुन दिला आहे. वैद्यकीय तपासणीसाठी मोबाईल व्हॅन सुरू केली आहे. खासदार व आमदारांनी त्यांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे.सॅम्पलींग वाढविले आहे. १६०० बेड तयार आहेत. बालेवाडीत ५०० बेडचे सेंटर कार्यान्वित केले आहे. काही हॉस्पिटलबरोबर करार केले आहेत.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम म्हणाले, एप्रिल महिन्यात मृत्यू दर व रुग्णसंख्या अधिक होती.आता कमी होताना दिसत आहे.बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या जवळपास ५० टक्के आहे.भविष्यात परिस्थिती बिकट झाली तर त्यादृष्टीने उपाययोजना केल्या आहेत .पुण्याहून अन्य राज्यात व जिल्ह्यात कामगार, मजूर, विद्यार्थी , नागरिक यांना पाठविण्यात येत आहे. जनजागृतीचे उपक्रमही राबविण्यात येत आहे.

Web Title: Private hospitals 80 percent beds will be taken over in pune district with city: Ajit Pawar orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.