पुणे : महानगरपालिकेने खासगी रुग्णालयांना कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस दिले जाणार नाहीत, असा पवित्रा घेतला आहे. शासनाकडून लस मिळणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. खासगी कंपन्यांकडून थेट लस घेण्याचा पर्याय असला तरी त्याबाबतची माहितीच रुग्णालयांकडे नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयांमधील लसीकरण ठप्प झाले आहे.
लसीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात केवळ शासकीय रुग्णालयांमध्ये प्रक्रिया सुरू करण्यात आली. लसींची उपलब्धता वाढल्यावर खाजगी रुग्णालयांनाही लसीकरणाची परवानगी देण्यात आली. हजारो नागरिकांनी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅकसिन लसीचे पहिले डोस खाजगी रुग्णालयामध्ये घेतले आहेत. आता खाजगी रुग्णालयांना महापालिकेकडून लस मिळणार नसल्याने दुसऱ्या डोसचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न रुग्णालयांसमोर उभा राहिला आहे. प्रशासनाकडून अशा प्रकारची कोंडी केली जाणे चुकीचे आहे, असे मत खाजगी रुग्णालय चालकांकडून व्यक्त केले जात आहे. १ मेपासून केवळ सरकारी रुग्णालयांमध्ये लस उपलब्ध झाल्यास नागरिकांची प्रचंड गर्दी होईल आणि लॉकडाऊनच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाईल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
------
लसींचा तुटवडा असल्याने लसीकरण बंद आहे. कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅकसिन या दोन्ही लसींचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांकडून दुसऱ्या डोससाठी विचारणा केली जात आहे. खाजगी रुग्णालयांना थेट लस उत्पादक कंपन्यांकडून डोस उपलब्ध व्हावेत, यासाठी संपर्क साधला होता. मात्र, भारत बायोटेकने एक महिना प्रतीक्षा करावी लागेल, असे सांगितले. तर, ''सिरम''कडून तीन महिन्यांचा वेटिंग पिरियड देण्यात आला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरणासाठी हजारो नागरिकांची गर्दी झाल्यास लॉकडाऊनचा काय उपयोग होणार? आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले नागरिक पैसे भरून खाजगी रुग्णालयांमध्ये लस घेण्यास तयार असताना सरकार अशा प्रकारे नाकेबंदी का करत आहे, हे समजण्यापलीकडचे आहे.
- डॉ. शैलेश पुणतांबेकर
------
१ मेपासून लसीकरणाची प्रक्रिया नव्याने सुरू होणार आहे. पुढील दोन दिवस महानगरपालिकेकडून खाजगी रुग्णालयांना लसींचा पुरवठा केला जाणार नाही. खाजगी रुग्णालयांनी त्यांच्याकडे असलेल्या शिल्लक साठ्यातून पुढील दोन दिवस लसीकरण करायचे आहे. १ तारखेपासून रुग्णालये थेट लस उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधून उपलब्ध साठा पाहून लसीकरणाचे नियोजन करू शकतात.
- डॉ. संजय देशमुख, सहायक संचालक, आरोग्य परिमंडळ, पुणे
आत्तापर्यंत आम्ही महापालिकेकडे पैसे भरून लस घेत होतो. मात्र, आता त्यांच्याकडून लस मिळणे बंद झाले आहे. कंपनीकडून कशा पध्दतीने लस घ्यायची याबाबतची कोणतीही स्पष्टता नाही. महापालिकेकडून १५० रुपये दराने लस मिळत होती. त्यामध्ये रुग्णालयांच्या सुविधेचा खर्च धरून अडीचशे रुपयांत लस दिली जात होती. मात्र,आता रुग्णालयांनाच चारशे रुपये दराने लस मिळणार आहे. त्यामुळे नागरिकांकडून पाचशे रुपये घ्यावे लागतील.
- डॉ. सुजय लोढा
-----